नवी मुंबई – नवी मुंबई शहराला विस्तीर्ण असा खाडी किनारा आहे. त्यामुळे खाडीकिनारी, पाणथळ क्षेत्रात विविध प्रकारचे स्थलांतरित पक्षी तसेच स्थानिक पक्षी आढळतात. मात्र या विविध प्रजातींच्या पक्षांची नोंद महापालिकेकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे आता राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाच्या निर्देशानुसार महापालिका शहरातील पाणथळ क्षेत्रात येणाऱ्या स्थलांतरीत व स्थानिक पक्षांची गणना करणार आहे. आशियाई पाणपक्षी गणना २०२३ उपक्रमाअंतर्गत ही गणना केली जाणार असून, दुसऱ्यांदा फेर निविदा काढली आहे. निविदा पूर्ण होताच पाणपक्षी गणनेला सुरुवात केली जाईल, अशी माहिती महापालिका पर्यावरण विभागाने दिली आहे.
नवी मुंबई शहराला विस्तृत असा खाडी किनारा आणि जैवविविधता लाभली आहे. या खाडी किनाऱ्यावर पक्षांना लागणारी जैवविविधता आहे. त्यामुळे दरवर्षी स्थानिक तसेच परदेशी पक्षी स्थलांतर करीत असतात. फ्लेमिंगोसह अनेक विदेशी पक्षी खाडी किनाऱ्यावर प्रत्येक वर्षी आश्रयाला येतात. मात्र महापालिकेकडे या पक्षांची अधिकृत माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे यावर्षीपासून नवी मुंबई महापालिका आशियाई पाणपक्षी गणना २०२३ उपक्रमाअंतर्गत या खाडी किनाऱ्यावरील पक्षांची गणना करणार आहे. यंदा प्रथमच महापालिकेच्या माध्यमातून आशियाई पाणपक्षी गणना २०२३ उपक्रमाअंतर्गत गणना केली जाणार आहे. त्याची पहिल्यांदा निविदा प्रकिया राबवली मात्र त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने पुन्हा फेरनिविदा काढण्यात आली आहे.
राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाच्या निर्देशानुसार महापालिका आशियाई पाणपक्षी गणना २०२३ उपक्रमाअंतर्गत या खाडी किनाऱ्यावरील पक्षांची गणना
करणार आहे. त्यासाठी पुन्हा फेरनिविदा काढण्यात आली असून लवकरच पात्र संस्थेस याचे कार्यादेश देऊन या पाणपक्षी गणनेला सुरुवात केली जाईल. – विजय राऊत, कार्यकारी अभियंता, पर्यावरण विभाग, नवी मुंबई महापालिका
हेही वाचा – गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया महागणार
काय आहे आशियाई पाणपक्षी गणना?
स्थलांतर करणारे पक्षी, त्यांचे वितरण, स्थिती आणि त्यांचा सर्वसाधारण कल काय आहे, यासंबंधी माहिती संकलित करण्यासाठी ही गणना करण्यात येते. दर वर्षी हा उपक्रम देशभरात स्वयंसेवी संस्था, पक्षीमित्र आणि वन विभागाच्या माध्यमातून राबवला जातो. वैज्ञानिक पद्धतीने व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली होत असल्याने पक्ष्यांच्या हालचाली, पक्ष्यांचे राहणीमान, त्यांचे खाद्यपदार्थ अशा विविध बाबी नोंदविल्या जातात.