ऑनलाइन, डेबिट कार्डद्वारे करभरणा शक्य; मोबाइल अ‍ॅपद्वारे थेट आयुक्तांपुढे गाऱ्हाणे मांडण्याची सुविधा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नोटाबंदीच्या पाश्र्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेने करदात्यांच्या सोयीसाठी विशेष अ‍ॅप तयार केले असून त्याद्वारे पालिकेची करआकारणी सुलभ होणार आहे. एनएमएमसी ईकनेक्ट या अ‍ॅपच्या माध्यमातून रोखरहित करभरणा करता येणार आहे. ऑनलाइन तक्रारी थेट मनपा अधिकारी व आयुक्तांपर्यंत पोहोचणार आहेत. महापालिकेची रुग्णालयेदेखील अ‍ॅपने जोडली जाणार असल्याने रांगेतून सुटका होणार आहे.

नवी मुंबई पालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या करदात्यांना आता अ‍ॅपच्या माध्यमातून डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरता येणार आहेत. मोबाइलवर ही सुविधा देण्यात आली असतानाच प्रत्येक विभाग कार्यालयामध्ये स्वाइप यंत्राद्वारे कर अदा करण्याची सोय देण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ४० बँकांचे डेबिट कार्ड करदात्या नागरिकांना वापरता येणार आहे. भविष्यात आणखी बँकांचा समावेश होणारआहे.

नागरिकांना मेल आणि अ‍ॅपवरून तक्रारी करता येणार असून त्यांचे निराकरण संबंधित अधिकाऱ्यांच्या पातळीवर केले जाणार आहे. या तक्रारींची दाखल त्वरित घेतली गेली नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्याकडे ती तक्रार आपोआप वर्ग होणार आहे. या वरिष्ठ अधिकाऱ्याकडेही तक्रार पडून राहिल्यास ती थेट आयुक्तांकडे जाईल. योग्य चौकशी करून आयुक्त संबंधित  दोषी अधिकाऱ्यावर वेतनवाढ रोखणे अथवा निलंबनाची कारवाई करतील. ही प्रणाली महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून मोबाइल अ‍ॅपवरदेखील सुविधा आहे. या सुविधेमुळे आता एका क्लिकवर आता परवाने, जन्मनोंद या सेवा उपलब्ध झाल्या आहेत.

परिवहन सेवेचे मासिक पास तिकीटदेखील आता मोबाइल प्रणालीवर उपलब्ध झाले आहेत. पीओएस यंत्राद्वारे ही सेवा देताना आता सुटय़ा पैशांची चणचण भासणार नाही. तिकिटाची व पासची रक्कम या यंत्राद्वारे कापली जाणार असून प्रवाशांनी आता या यंत्रांचा अधिक वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अशा प्रकारची सुविधा देणारी नवी मुंबई महानगरपालिका देशातील पहिली महापालिका असल्याचा दावा करण्यात आला आहे.

एनएमएमटीच्या व्होल्वोचे तिकीट अ‍ॅपवर

प्रवाशांना तत्पर सेवा मिळावी यासाठी नवी मुंबई महापालिका परिवहन विभागाने वातानुकूलित बसच्या प्रवाशांसाठी मोबाईल अ‍ॅपद्वारे तिकीट बुकिंगची सुविधा सुरू केली आहे. एनएमएमटीच्या वातानुकूलित सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुटय़ा पैशांच्या चणचणीमुळे येणारी अडचण लक्षात घेता परिवहन सेवेने प्रवाशांना दिलासा देत मोबाइल अ‍ॅपद्वारे तिकीटची सुविधा सुरू केली आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन प्रशासनाने केले आहे. मोबाइलच्या प्ले स्टोअरमध्ये जाउन अ‍ॅप डाउन लोड करावयाचा आहे. या अ‍ॅपमध्ये मोबाइल नंबर टाकून प्रवाशांना तिकीट बुकिंग करता येईल. मोबाइलवर आलेला कोड क्रमांक दाखवून प्रवास करता येईल.

प्रवाशांना नोटाबंदीचा त्रास सोसावा लागत होता.ही बाब लक्षात घेता एनएमएमटीने अ‍ॅपद्वारे वातानुकूलित सेवेसाठी तिकीट बुकिंगची सेवा सुरू केली आहे. ही सेवा या पुढे देखील कायम राहणार आहे. नागरिकांना इच्छित स्थळी जाता यावे आणि नवी मुंबईला इतर शहरांशी जोडले जावे या उद्देशाने परिवहनचे नवे मार्ग सुरू करण्यात येणार असून त्या सेवांचा नागरिकांना फायदा होईल. परिवहनच्या तिजोरीतदेखील भर पडेल.

-शिरीष आरदवाड, परिवहन व्यवस्थापक

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai mumbai corporation to go cashless
First published on: 06-12-2016 at 04:40 IST