महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचे स्पष्टीकरण

नवी मुंबईतील ग्रामीण भागांत २०१५ पर्यंत करण्यात आलेल्या बेकायदा बांधकामांवर महापालिकेमार्फत कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा पुनरुच्चार आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी स्थायी समितीच्या सभेत केला. २०१२ पर्यंत उभारण्यात आलेली बेकायदा बांधकामे नियमित करण्यासंबंधी राज्य सरकारकडून अद्याप कोणतेही ठोस आदेश आले नसले, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधी सुतोवाच केले आहे. त्यामुळे २०१२ पूर्वी उभारण्यात आलेल्या बांधकामांवर कारवाई करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले. असे असले तरी डिसेंबर २०१५ नंतर उभारण्यात आलेल्या किंवा वारंवार सूचना देऊनही नव्याने उभ्या रहाणाऱ्या बांधकामांवर कारवाई केली जात आहे, असे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.

नवी मुंबईतील झोपडपट्टी परिसरात मलवाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव गुरुवारी प्रशासनामार्फत स्थायी समितीपुढे मांडण्यात आला होता. केंद्र आणि राज्य सरकारने आाखलेल्या स्वच्छ भारत, स्वच्छ महाराष्ट्र अभियानांच्या माध्यमातून ही कामे करण्यात येणार आहेत. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात केंद्र सरकारने आखलेल्या जवाहरलाल नेहरू विकास योजनेच्या माध्यमातून नवी मुंबईतील शहरी भागात मोठय़ा प्रमाणावर अंतर्गत मलवाहिन्या टाकण्याची कामे पूर्ण करण्यात आली

आहेत. मात्र, झोपडपट्टी आणि गावठाण भागात अशा वाहिन्या टाकण्यात आल्या नसल्याने येथील घरांमध्ये शौचालयांची उभारणी करण्यात अडचणी येत आहेत.

या विषयावरील चर्चेचा सूर बेकायदा झोपडय़ा आणि बांधकामांवर होत असलेल्या कारवाईच्या दिशेने सरकला.

या वेळी स्थायी समिती सभापती शिवराम पाटील, जयवंत सुतार, एम. के. मढवी यांनी गावठाण आणि झोपडय़ांवर केल्या जाणाऱ्या कारवाईचा मुद्दा उपस्थित केला. सभापती पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर मोठय़ा प्रमाणावर कारवाई सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित करताना सिडकोच्या माध्यमातून ही घरे नियमित झाल्याचा दावाही केला.

तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या काळात प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्याचा विषय मार्गी लावला असतानाही गावांमधील बांधकामांवर कशाच्या अधारे कारवाई केली जात आहे, असा मुद्दा या वेळी उपस्थित करण्यात आला.

सदस्यांच्या प्रश्नांवर खुलासा करताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जुन्या बांधकामांवर अशी कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे स्पष्टीकरण दिले.

गावठाण, झोपडपट्टीत मलनिस्सारण वाहिन्या टाकणार

’ गाव, गावठाण व झोपडपट्टी परिसरात मलनिस्सारण वाहिन्या टाकण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत स्पष्ट केले.

’  ऐरोली विभागातील समतानगर, साईनाथ वाडी, ऐरोली नाका व गणपती कॉलनी येथे वैयक्तिक शौचालये बांधण्यासाठी मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत पटलावर आला होता. या वेळी सभागृह नेते जे.डी. सुतार यांनी नेरुळ व सारेसोळे गावात मलनिस्सारण वाहिन्या टाकण्यात आल्या नसल्याचे सांगितले. गाव-गावठाण व झोपडपट्टीतदेखील मलनिस्सारण वाहिन्या टाकणे आवश्यक आहे असे म्हणाले. सीबीडी येथे गावस्कर मैदान परिसरातील झोपडपट्टी, पोलीस लाईनमध्ये मलनिस्सारण वाहिन्या टाकण्यात आल्या नसल्याचे त्यांनी सांगितले. असे नगरसेवक अशोक गुरखे म्हणाले, तुभ्रे येथील माथाडी भवन येथे मलनिस्सारण वाहिन्या नाहीत. पालिका शौचालय वरून सुंदर बनवते. पण आत बजबजपुरी असते, असा आरोप नगरसेविका शुभांगी पाटील यांनी केला. शहर हागणदारीमुक्त करण्यासाठीच्या पालिकेच्या प्रयत्नांचे एम. के. मढवी यांनी कौतुक केले.

सभेत सायंकाळी ६च्या सुमारास १११पैकी केवळ ३५ नगरसेवक उपस्थित होते.