महापालिकेचे ८० हजार झाडे लावण्याचे नियोजन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई : कोपरखैरणे येथील निर्सग उद्यानात मियावॉकी तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आलेल्या वृक्षसंपदेनंतर नवी मुंबई महापालिका पामबीच मार्गावरील ज्वेल ऑफ नवी मुंबई या जॉिगग ट्रॅक परिसरात ८० हजार झाडे लावणार आहे. त्यामुळे ज्वेल परिसरात वनराई फुलवली जाणार आहे.

या वृक्ष लागवडीचा श्रीगणेशा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे करणार होते, मात्र गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे ते नवी मुंबईत आले नाहीत. मात्र प्रातिनिधिक स्वरूपात या लागवडीचा शुभारंभ करण्यात आला असून पालिका या परिसरात घनदाट जंगल निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे.

नवी मुंबई महापालिकेने कोपरखैरणे येथील जुन्या क्षेपणभूमीवर विस्तीर्ण असे निर्सग उद्यान तयार केले आहे. यासाठी अलीकडे मियावॉकी तंत्रज्ञान वापरून सव्वा लाख झाडांची वनराई तयार करण्यात आली आहे. मुंबई पालिकेनेही या तंत्रज्ञानाचा वापर करून ठिकठिकाणी वृक्षसंपदा वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. त्याची पुनरावृत्ती नवी मुंबई पालिकेने सुरू केली असून कोपरखैरणे येथील उद्यानात ही लागवड मोठय़ा प्रमाणात झालेली आहे. या तंत्रज्ञानाने कमी कालावधीमध्ये काही देशी झाडांची वनराई तयार होत असल्याने पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या तंत्रज्ञानाचा पुरस्कार करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे शहरी भागात वृक्षसंपदा तयार करण्याचे काम स्थानिक स्वराज्य संस्थांनी हाती घेतले आहे.

कोपरखैरणे येथील नक्षत्र उद्यानाचा परिणाम पाहता आता पामबीच मार्गावर पालिकेने तयार केलेल्या ज्वेल ऑफ नवी मुंबई या जॉगिंग ट्रॅकजवळ जास्तीतजास्त झाडांची लागवड करण्याची तयारी पालिकेने केली आहे. या वृक्षसंपदेची जबाबदारी एका संस्थेला देण्यात आली आहे. त्यांनी कोपरखैरणे येथे हे मियावॉकी उद्यान तयार केले आहे.

खारफुटीतोड बंद झाल्याने जैवविविधतेत वाढ

नवी मुंबईला साठ किलोमीटर लांबीचा खाडी किनारा लाभला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने खारफुटी संर्वधनासाठी समिती स्थापन केल्यानंतर नवी मुंबईत होणारी खारफुटीची तोड थांबली आहे. यामुळे खाडीकिनारी मोठय़ा प्रमाणात कांदळवनाचे जंगल वाढले आहे. या जंगलात आता जैवविविधताही वाढल्याचे दिसत आहे. कोल्ह्यांची संख्या वाढली असून काही महिन्यांपूर्वी कोपरखैरणे गावाजवळ कोल्हा आढळून आला होता. आता याच भागात कोल्ह्याची पिल्लेही आढळली आहेत. ज्वेल ऑफ नवी मुंबईमध्ये केवळ झाडे न लावता या ठिकाणी नागरिकांसाठी योग, ध्यान केंद्र तयार केली जाणार असून निर्माण होणाऱ्या जंगलात ये-जा करण्यासाठी नैसर्गिक पदपथ तयार केले जाणार आहेत. नागिरकांनी या जंगलात फेरफटका मारल्याशिवाय जंगलांची आवड आणि संवर्धन होणार नाही. यासाठी ज्वेल ऑफ नवी मुंबई नव्याने कात टाकणार आहे.

– अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai municipal corporation plans to plant 80000 trees on palm beach road zws
First published on: 10-02-2022 at 01:57 IST