सोळा सदस्यसंख्या असलेल्या नवी मुंबई पालिकेच्या स्थायी समितीतून अर्धे सदस्य १ मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी नवीन आठ सदस्यांची नियुक्ती पुढील महिन्यात केली जाणार आहे. या सोळा सदस्यांमधून मे महिन्यांत सभापती निवडला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवृत्त पाच सदस्यांमध्ये विद्यमान सभापती नेत्रा शिर्के यांचा समावेश आहे. गेली वर्षभर पालिकेची तिजोरी यशस्वीपणे सांभाळणाऱ्या शिर्के यांना पुन्हा सभापतिपदाची लॉटरी लागणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीकडून त्यांना स्थायी समितीत पाठविण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
११० नगरसेवक संख्या असलेल्या नवी मुंबई पालिका स्थायी समितीत गेली २० वर्षे १६ सदस्य आहेत. त्यातील अर्धे म्हणजेच आठ सदस्य दरवर्षी निवृत्त होत असतात. ही निवृत्ती चिठ्ठीद्वारे ठरवली जाते. सोमवारी विद्यमान सोळा सदस्यांमधील विद्यमान सभापती नेत्रा शिर्के, सुरेश कुलकर्णी, रवींद्र इथापे, शंकर मोरे, शशिकांत राऊत, भाजपचे रामचंद्र घरत, शिवसेनेच्या कोमल वास्कर आणि काँग्रेसच्या रूपाली भगत या आठ सदस्यांचा समावेश आहे. त्यांच्या जागी पुढील महिन्यात निवडणुकीद्वारे आठ सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस काठावर पास झाली असून सत्तेसाठी काँग्रेसचा आधार घेण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या एका नगरसेविकेचे पद खोटे जातीचे प्रमाणपत्र सादर केल्याने रद्द झाले आहे. त्या ठिकाणी पुढील महिन्यात पोटनिवडणूक होत असून शिवसेनेने ही जागा राष्ट्रवादीकडून खेचून आणण्याचा चंग बांधला आहे. तो यशस्वी झाल्यास राष्ट्रवादीची एक नगरसेवक कमी होऊन शिवसेनेचा वाढणार आहे. त्याचबरोबर बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी दिघ्यातील चार नगरसेवकांचे पद रद्द होण्याच्या मार्गावर आहे. त्याचबरोबर काही नगरसेवक जात, अपत्यांची खोटी कागदपत्र सादर केल्याने चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. त्यामुळे अपक्षांच्या सहकार्याने ५७ आकडा गाठणारे राष्ट्रवादी कोणत्याही क्षणी अल्पमतात येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. त्यामुळे काँग्रेसच्या मदतीने महापौर वा स्थायी समितीवर दावा ठोकण्याचा प्रयत्न शिवसेना भाजप युती करण्याच्या तयारीत आहे. त्याची रंगीत तालीम पुढील महिन्यात होणाऱ्या स्यायी समिती सदस्य निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे पाच तर शिवसेना भाजपा व काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य स्यायी समिती सभागृहात जाणार आहे. त्या वेळी राष्ट्रवादीचा एक सदस्य कमी करण्याचा प्रयत्न युती करणार आहे. राष्ट्रवादीच्या कोटय़ातून स्यायी समिती सभेत जाणाऱ्या चार किंवा पाच सदस्यांमध्ये विद्यमान निवृत्त सभापती नेत्रा शिर्के यांचा पुन्हा क्रमांक लागणार असून त्याच दुसऱ्यांदा सभापतीच्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. शिर्के यांना पक्षातून जास्त विरोध झाल्यास सभागृह नेता जयवंत सुतार हा दुसरा पर्याय राहणार आहे.
