नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सात मलःनिसारण केंद्रातून कोट्यवधी रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेले प्रक्रियायुक्त पाणी वापराविना समुद्रात सोडण्यात येत होते. परंतु याच पाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी आता नवी मुंबई महापालिकेतील काही औद्योगिक कंपन्यांना दिले जाते. नवी मुंबई विमानतळासाठीही आता पालिकेकडून प्रक्रियायुक्त पाणी दिले जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव पालिकेला विमानतळ प्राधिकारणाकडून प्राप्त झाला आहे. बेलापूर मलःप्रकिया केंद्रातून पाणी देण्याचे पालिकेचे नियोजन आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात केंद्राच्या अमृत योजनेअंतर्गत टर्शिअरी ट्रिटमेंट प्रकल्पाद्वारे पाण्यावर प्रक्रिया केली जाते. यासाठी जवळजवळ ३०७ कोटी रुपये खर्च करण्यात आले. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सिडकोकडून हस्तांतरित झालेले एक व महापालिकेने बांधण्यात आलेली सहा अशी एकूण सात मलःप्रक्रिया केंद्रे आहेत. त्यातून तयार झालेले पाणी समुद्रात सोडण्यात येत होते. परंतु राज्य शासनाच्या ३० नोव्हेंबर २०१७च्या निर्णयानुसार औष्णिक विद्युत केंद्रांना प्रक्रियायुक्त पाण्याचा पुनर्वापर बंधनकारक केले. पालिका १८ रुपये ५० पैसे प्रतिघनमीटर दराने पाणीविक्री करते. आतापर्यंत एमआयडीसीकडून कंपन्यांना २२ रुपये ५० पैसे प्र.घ.मी. दराने पैसे आकारत होती. आता पालिकेकडून त्यांना १८.५० दराने पाणी मिळत असल्याने कंपन्यांचा फायदा होत आहे.

पुनर्प्रक्रियायुक्त पाणी एमआयडीसी क्षेत्रात पुरवण्यासाठी एकूण ८३ किमी पाइपलाइन टाकली आहे. एमआयडीसी क्षेत्रात ज्या पध्दतीने एमआयडीसीतील कंपन्यांना जवळजवळ १७ एमएलडी प्रक्रियायुक्त पाणी दिले जाते. त्याच पद्धतीने आता नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाला नवी मुंबई महापालिकेकडून प्रक्रियायुक्त पाणी दिले जाणार आहे.

नवी मुंबई महापालिका व एमआयडीसीमध्ये प्रक्रियायुक्त पाणी देण्याच्या करारानुसार काही कंपन्यांना पाणी दिले जात आहे. आता नवी मुंबई विमानतळ प्राधिकारणाकडूनही पाच एमएलडी पाणी मागणीचा प्रस्ताव आलेला आहे. त्यामुळे बेलापूर मलःनिसारण प्रकल्पातून हे पाणी नवी मुंबई विमानतळाला दिले जाणार आहे.त्याबाबतची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.- अरविंद शिंदे, अतिरिक्त शहर अभियंता