नवी मुंबई : मुंबईतला बांधकामातील राडारोडा अटलसेतू मार्गे नवी मुंबईत अनधिकृतपणे टाकण्याचा प्रकार वाढत असल्याने नवी मुंबई पोलिसांनी मोठी मोहीम राबवत तब्बल १० डंपर जप्त केले आहेत. अटलसेतू सुरु झाल्यानंतर अशा डंपरची संख्या रात्रीच्या सुमारास शेकडोंच्या घरात पोहोचल्याचं समोर आलं आहे. हे वाहन चालक शहरातील कोणतीही रिकामी जमीन, सिडकोने संपादित केलेली क्षेत्रे किंवा बांधकाम क्षेत्राजवळ जागा मिळेल तिथे राडारोडा टाकून पसार होत असल्याची माहिती मिळाली होती.

पूर्वी सिडकोचे अभियंते आणि पोलीस यांच्या सहकार्याने कारवाई केली जात होती; मात्र वाढत्या तक्रारींमुळे आता नवी मुंबई पोलिसांनी कंबर कसत मोठी कारवाई केली आहे. बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास उलवे परिसरात नवी मुंबई पोलिस व वाहतूक विभागाने संयुक्त गस्त घालत ही कारवाई केली. जे डंपर जप्त करण्यात आले, ते अटलसेतूवरून उलवे सेक्टर १२ परिसराकडे येत होते. यावेळी चालक अनधिकृतरीत्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरासह सिडकोच्या जमिनीवर राडारोडा टाकण्याच्या तयारीत होते.वडाळा, अॅन्टॉपहिल, वरळी व गोवंडी परिसरातील ९ चालकांना अटक करण्यात आली असून एका वाहनाचा चालक डंपर सोडून पसार झाला.या सर्व चालकांविरुद्ध उलवा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २७१ व ६२ अंतर्गत गुरूवारी पहाटे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आरोग्य व पर्यावरण धोका

सिडकोने दिलेल्या माहितीनुसार या प्रकारे टाकला जाणारा राडारोडा आणि माती मानवी आरोग्यास धोकादायक व पर्यावरणासाठी हानिकारक आढळली आहे. अवैधपणे राडारोडा टाकताना कुणी आढळल्यास नागरिकांनी त्वरित तक्रार करावी तसेच सिडकोच्या http://www.cidco.maharashtra.gov.in संकेतस्थळ आणि स्थानिक पोलीस ठाण्यातही संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.