नवी मुंबई : नवी मुंबईतील सह दुय्यम निबंधक मुद्रांक नोंदणी व शुल्क कार्यालय क्रमांक ८ मधील दस्त घोटाळ्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ मध्ये बुधवारी प्रसिद्ध झाल्यानंतर या घोटाळ्यातील दलाल संस्कृतीची धावपळ सुरू झाली. एका दिवशी दोन वेळाच साक्षीदार म्हणून स्वाक्षरी करता येते. परंतु काही दलालांनी दहा दिवसात ८४२ दस्त नोंदणीवेळी खूपच आघाडी घेतल्याचे चित्र आहे. एका दिवसात १० हून अनेकदा साक्ष देणाऱ्या ३७ साक्षीदारांची नावे उपमहानिरीक्षक व उपनियंत्रक राहुल मुंडके यांच्या नेतृत्वाखालील चौकशी समितीच्या नजरेत आली आहेत.

उपमहानिरीक्षक मुंडके यांनी जुलै महिन्यात दुय्यम निबंधक (श्रेणी १) डी. एम. पांढरेकर, आरती चव्हाण, वरिष्ठ लिपीक डी. बी. वळवी, कनिष्ठ लिपीक मनोज पाडेकर यांची समिती नेमली. याच चौकशी समितीमधील सदस्यांनी राजकुमार दहिफळे यांच्या सह दुय्यम निबंधक कार्यालयात एप्रिल ते जून या दरम्यान केलेल्या कामकाजाची चौकशी केल्यावर राजकुमार यांचे प्रताप उघडकीस आले.

जून महिन्यात वर्षातील इतर महिन्यांपेक्षा दुप्पट १५१३ दस्त नोंदवले गेल्याचे चौकशी समितीमध्ये उघड झाले. यापैकी २१ ते २८ जून दरम्यान ९०२ दस्त नोंद करण्यात आले. शनिवार व रविवारी या सुट्यांच्या दिवसांमध्ये १८ ते २८ जून या दरम्यान या कार्यालयात अनधिकृत बांधकामांचे दस्त नोंदवले गेल्याचे चौकशी समितीने राजकुमार यांच्यावर ठपका ठेवला आहे.

सध्या मुद्रांक शुल्क विभागाने केवळ निलंबन व चौकशीपुरते आदेश दिले आहेत. अनधिकृत बांधकामांची ८४२ दस्त नोंदणी कऱणे हे आर्थिक फसवणूकीचा गुन्हा आहे. चौकशीच्या अहवालावरून हे सिद्ध झाले आहे, तरी अजूनही या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल झालेला नाही. या प्रकरणामुळे इतर सह निबंधक कार्यालयांची तपासणी करण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

नवी मुंबईतील मुद्रांक शुल्क विभागातील सह दुय्यम निबंधकाविरोधातील तक्रारीनंतर चौकशी करण्याचे आदेश दिले. प्राथमिक चौकशीत त्यांनी केलेल्या चुकीच्या कामांमुळे त्यांच्यावर निलंबनाचे आणि पुढील चौकशीचे आदेश दिले आहे. आयजीआर विभागाकडून पुढील कारवाई होणार आहे. ज्या कार्यालयाची तक्रार येईल तेथे कारवाई होईलच. आमच्या विभागाचे स्वतंत्र तपासणी पथक त्यांची कार्यवाही करत आहे. – विनायक लवटे, अवर सचिव, महसूल विभाग