जागावाटपापूर्वीच नवी मुंबईत राजीनामासत्र; आरोप-प्रत्यारोप
नवी मुंबई : नवी मुंबईतील बेलापूर व ऐरोली येथील दोन्ही जागा युतीच्या सोडल्या गेल्याची खात्री झाल्यानंतर शिवसेनेचे शहरप्रमुख विजय माने यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. बेलापूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
गणेश नाईक यांच्या भाजपमधील आगमनापूर्वी ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे ऐरोलीतून संदीप नाईकांना उमेदवारी मिळेल हे निश्चित आहे, तर बेलापूरमधून शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती.
नाहटा यांनी मागील निवडणुकीत पराभूत झाल्यापासून पुन्हा लढण्याची तयारी केली होती; परंतु नवी मुंबईतील दोन्ही जागा भाजपला सोडल्या जाण्याच्या शक्यतेने नाहटा समर्थकांमध्ये मात्र नाराजी पसरली आहे. याबाबत नाहटा यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, तर शिवसेनेचे शिवराम पाटील यांनी पक्षादेश मान्य करू, असे स्पष्ट केले.
मंदा म्हात्रे निवडणूक लढविणार?
पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीला रामराम ठोकणाऱ्या भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी कोणत्याही स्थितीत निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आपल्यासाठी पक्षाने हा मतदारसंघ कायम ठेवल्याचा विश्वास व्यक्त करून आपण निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. या मतदारसंघात नाईक यांना भाजपने उमेदवार म्हणून जाहीर केल्यास मंदा म्हात्रे यांची बंडखोरी निश्चित मानली जात आहे. पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या म्हात्रे यांनी विधानसभा निवडणुकीत नाईक यांचा पंधराशे मतांनी पराभव केला होता. म्हात्रे यांनी पक्षाने उमेदवारी न दिल्यास इतर पर्याय खुले ठेवले आहेत.
याबाबत घोषणा झाली नाही. त्यामुळे शिवसैनिकांनी शांत राहावे. पक्षाचा आदेश महत्त्वाचा असून पक्षप्रमुखांचा निर्णय स्वीकारला पाहिजे. युतीचा धर्म सर्वानीच पाळवा.
– विठ्ठल मोरे, जिल्हाप्रमुख, नवी मुंबई</strong>
नवी मुंबईतील बेलापूरची जागा शिवसेनेला मिळेल अशी आशा होती; परंतु आता ज्यांच्या विरोधात आम्ही लढलो त्यांचा प्रचार आम्हाला करावा लागणार हे आम्हाला मान्य नाही. अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला असून मी बेलापूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणार आहे. – विजय माने, शहरप्रमुख
नवी मुंबईत शिवसेनेचे नेते म्हणवणाऱ्यांनीच शिवसेनेतील एकजूट संपवली. त्यामुळेच आज शिवसेनेवर ही वेळ आली आहे. आपापसातील वादाचा हा फटका असून त्याला नवी मुंबईत शिवसेना नेते म्हणवणारेच जबाबदार आहेत.
– विजय चौगुले, विरोधी पक्षनेता, नवी मुंबई महापालिका