नवी मुंबई: नवी मुंबईतील नेरुळ भागात दोन दिवसात तीन घरफोडीची नोंद झाली असून यात तब्बल ३१ लाख ३७ हजार ६०० चा ऐवज चोरी झाला आहे. यात सोन्याचे दागिने रोकड आणि एका मंदिरातील ३ लाख रुपयांच्या समईचा समावेश आहे. या प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नवी मुंबईत घरफोडीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसात तीन घरफोडीचे गुन्हे नोंद झाले आहेत. यात लाखो रुपयांचा ऐवज चोरी झाला आहे. वाढत्या घरफोडी आणि गुन्हे उकल संख्या घसरत असल्याने पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न चिन्ह उमटले आहे. नेरुळ सेक्टर १५ येथे सुशील गुरव आपल्या कुटुंबियांसमवेत राहतात. तीन दिवसांच्या पूर्वी घरातील सर्वजण देवदर्शनासाठी भीमाशंकर येथे गेले होते. भीमाशंकर येथून देवदर्शन घेऊन पार्ट आल्यावर घराच्या दरवाजाचा काडी कोयंडा तुटलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच वेळी घरात चोरी झाल्याचे लक्षात आले होते. घरात जाऊन पाहणी केली असता २ लाख ७० हजार रुपयांची ३० तोळ्याची मोहनमाळ, ४५ हजाराचे ५ ग्रॅम सोन्याचा बदाम , ४० हजार रुपयांचे ४ ग्रॅम सोन्याचे कानातील डूल , असे एकूण १० दागिने तसेच दोन मनगटी घड्याळ आणि २० हजाराची रोकड असा एकूण ४ लाख ५७ हजार ६०० रुपयांचा ऐवज आढळून आला नाही . हि घटना १३ ते १४ तारखेच्या दरम्यान घडला आहे. या प्रकरणी रविवारी रात्री अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेरुळ सेक्टर ५ येथे एस आय इ एस महाविद्यालय आवारात असणाऱ्या अंजनीया मंदिरात चोरीची घटना घडली. अनोळखी चोरट्याने मंदिरात प्रवेश करीत मंदिरात देवासाठी असणारी दोन फूट उंचीची ३ लाख ९० हजार रुपये किमतीची पितळी समई चोरी झाली आहे. हि घटना नोव्हेंबर २०२४ ते ३ जून दरम्यान घडला आहे. मात्र समई चोरी झाल्याचे लक्षात आले नव्हते. सामानाची पाहणी करताना हि बाब उघडकीस आल्यावर रविवारी या बाबत नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारीच अशाच एका गुन्ह्याची नोंद नेरुळ पोलीस ठाण्यात झाली आहे. शिरवणे येथे मिलिंद भोईर हे राहतात. त्यांच्या घरात त्यांच्या आईच्या शयन कक्षातील कपाटात ठेवलेले ६ लाख ८० हजार रुपयांचा ८५ तोळ्यांचा सोन्याचा हार, ४ लाख ८० हजार रुपयांच्या ६० ग्रॅम वजनाच्या दोन सोनसाखळ्या, ३ लाख २० हजार रुपयांचे ४० ग्रॅम वजनाचे ३ जोडी कानातील डूल, असे एकूण २२ लाख ९० हजार रुपयांचे ८ दागिने चोरी झाले आहेत. हि चोरी २० ऑगस्ट ते ३० ऑगस्ट दरम्यान झाली असून याबाबत रविवारी फिर्याद दिल्या नंतर अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.