नवी मुंबई : वाहतूक नियंत्रण करीत असताना हायड्रा गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने गणेश पाटील या वाहतूक हवालदाराला धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाला आहे. हि घटना महापे उड्डाणपुलाखाली आज सकाळी साडे आकाराच्या सुमारास घडली आहे. गणेश पाटील हे गेल्या काही वर्षांपासून वाहतूक पोलीस विभागात कार्यरत होते. सध्या महापे या ठिकाणी आपले कर्तव्य बजावत होते. हा भाग एमआयडीसी मध्ये येत असून या ठिकाणी जड अवजड वाहनांची दिवसरात्र वर्दळ असते. त्या सोबत एमआयडीसी मध्ये काम करणाऱ्या हजारो कामगार अधिकारी यांच्या गाड्यांची वर्दळीची भर पडते. त्यामुळे वाहतूक नियंत्रण करणे अनेकदा जिकरीचे होते. त्यातून अनेक अपघात होतात.
अशाच अपघातात आज सकाळी गणेश पाटील या वाहतूक हवालदाराने अपघाती निधन झाले. सकाळी दहा पासून ते वाहतूक बिट चौकी नजीकच्या उड्डाणपुलाखाली आपले कर्तव्य बजावत होते. त्यावेळी एक हायड्रा गाडी त्या ठिकाणी वळण घेत असताना त्याला मार्ग दाखवत असताना हायड्रा गाडी चालकाच्या हयगय मुळे पाटील यांचा अपघात झाला. अपघात होताच तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी हायड्रा चालक राजेश गौड विरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे. अशी माहिती तुर्भे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी दिली.