नवी मुंबई: प्रक्रिया न करताच उघड्यावरील नाल्यात रासायनिक पदार्थ सोडत असणारे दोन टँकर जप्त करण्यात आले आहेत. नवी मुंबईतील दिघा परिसरात असणाऱ्या नाल्यात हे रासायनिक सोडण्यात येत होते. दिघा ऐरोली परिसरातील नागरिक आणि मनसेच्या रेट्या नंतर ही कारवाई नवी मुंबई महानगर पालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळाने पोलीस बंदोबस्तात ही कारवाई मंगळवारी अपरात्री दीडच्या सुमारास केली आहे.

नवी मुंबई लगत आशियातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असून ” ठाणे बेलापूर इंडस्ट्रिअल बेल्ट” नावाने ओळखला जाते . या ठिकाणी अनेक रासायनिक पदार्थ उत्पादन वा वापर करणारे कारखाने आहेत. येथील रासायनिक पदार्थ प्रक्रिया करून नाल्यात सोडले जातात जो नाला पुढे खाडीला जाऊन मिळतो. मात्र अनेकदा प्रक्रिया न करताच रात्रीच्या वेळी रासायनिक पदार्थ नाल्यात सोडले जातात. त्यामुळे त्यातून येणाऱ्या उग्र वासाने नागरिकांना त्रास होतो. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळ फारशी दखल घेत नाही किंवा जुजबी कारवाई करून सोडून देते असा आरोप नेहमी होत असतो.

मात्र गेल्या दोन आठवड्यात पासून ऐरोलीत बहुतांश ठिकाणी उग्र वासाचा त्रास जाणवत होता. त्यात खास करून नाला परिसर शेजारी असणाऱ्या ग्रीन वर्ल्ड सीएचएस, नेवा भक्ती पार्क आणि न्यू गार्डन सीएचएस, ऐरोली या परिसरात रोज संध्याकाळी उग्र वास येत होता. त्यामुळे घशाला खवखव होणे, कोरडं पडणे, ढास लागणे, डोळ्यांची जळजळ होणे, डोके दुखी, खाज येणे असे त्रास सुरु झाले. हा त्रास जेष्ठ नागरिक आणि लहान मुलांना अधिक होत होता. याबाबत महापालिका आणि रबाळे पोलीस स्टेशनला पंधरा-वीस दिवसापासून तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अनेक स्थानिक नागरिकांनी केल्या होत्या.

रोज तक्रारी प्राप्त होत असल्याने अखेर मंगळवारी प्रदूषण नियंत्रण मंडळ, आणि मनपाने विविध पथके नाला परिसरात गस्त घालत असताना रात्री दीड वाजता दोन दिघा परिसरातील मुकुंद कंपनी प्रवेशद्वार नजिक मालवण मंत्रा हॉटेल जवळ असणाऱ्या नाल्यात दोन टँकर मधून रासायनिक पदार्थ सोडताना आढळून आले. १२ हजार लिटर रासायनिक पदार्थ बेकायदेशीरपणे नाल्यात सोडत होते.

मात्र आपल्या दिशेने पथक येत असल्याचे लक्षात येताच टँकर चालक टँकर सोडून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पळून गेले. प्रदूषण नियंत्रण मंडळच्या पथकाने ग्रीन वर्ल्डच्या रहिवाशिंसोबत ही कारवाई केली. . त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि नवी मुंबई मनपा यांनी संयुक्तपणे राबाळे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये टँकर आणि जमीन मालकाविरुद्ध तक्रार दाखल केली. हे टँकर जप्त करण्यात आले आहेत.

यावेळी, मनसे उप शहर अध्यक्ष निलेश बानखिले आणि उत्तम भादवणकर यांच्यासह ग्रीन वर्ल्डचे रहिवासी रामेश्वर गुड्डा, डी. एल. भादवनकर, अरविंद मोरे, वीरसेन कदम, श्रीराम मोहिते आणि अनुराग पटनायक हे सर्वजण रात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत घटनास्थळी उपस्थित होते.

रासायनिक दुर्गंधीपासून आता आम्हाला दिलासा मिळेल आणि त्यांना सामान्यपणे श्वास घेता येईल, जो जगण्याचा त्यांचा मूलभूत हक्क आहे. अशी आशा रामेश्वर गुड्डा यांन्नी व्यक्त केली तर या पुढे ही कारवाईत सातत्य राहावे. तक्रार प्राप्त होण्याची वाट न पाहता स्वतः होऊन ठोस कारवाई प्रदूषण नियंत्रण मंडळाने करावी अशी प्रतिक्रिया मनसे शहर उपाध्यक्ष नीलेश बानखिले यांनी दिली. नाल्यात सोडण्यात येणारे द्रव रासायनिक असून ते नेमके कुठले याबाबत तपासणी अहवालतून समोर येईल अशी माहिती देण्यात आली आहे.