नवी मुंबई: नवी मुंबईत वाहन चोरीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे पे अँड पार्कमध्येच गाडी लावणे सुरक्षित समजले जाते. मात्र आता पे अँड पार्कमधूनही दुचाकी चोरीची घटना घडल्याने गाडी पार्क करण्यास कुठली सुरक्षित जागा असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वाहन चोरीच्या प्रमाणात वाढ होत आहे. जागा दिसेल तिथे रस्त्यावर पार्क केलेल्या गाडी चोरी जास्त होत असल्याने सीसीटीव्ही असलेल्या पे अँड पार्कमध्ये गाड्या पार्क करणे सुरक्षित आहे असे समजून आता पे अँड पार्कमध्ये गाड्या पार्क करण्याचा कल वाढत आहेत. त्यासाठी दोन पैसे गेले तरी चालेल मात्र वाहन तरी सुरक्षित राहिल असे समजून गाड्या पे अँड पार्कमध्ये लावल्या जातात. मात्र अशातच नवी मुंबईतील सीबीडी येथे पे अँड पार्कमधून गाडी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे.
सीबीडी बेलापूर येथे राहणारे सिकंदर पासवान हे नळ जोडणीचे (प्लम्बर) काम करतात. त्यांच्याकडे दुचाकी असून कामानिमित्त ही दुचाकी त्यांचा भाऊ बालगोविंद पासवान याने घेतली. काम करण्यासाठी एके ठिकाणी जात असताना सीबीडी सेक्टर ११ येथील मेट्रो रेल्वे पुलाखालील सिडकोच्या पे अँड पार्कमध्ये त्यांनी दुचाकी लावली. काम संपवून परत आले असता दुचाकी आढळून आली नाही. ही घटना ३० जून रोजी घडली. मात्र दुचाकी भावाने नेली असेल असे वाटले. मात्र भावाने नेली नाही असे समजल्यावर गाडीचा शोध घेणे सुरु केले. मात्र गाडी आढळून न आल्याने मंगळवारी सीबीडी पोलीस ठाण्यात येत दुचाकी चोरीची तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करीत घटनास्थळ पाहणी केली. पोलीस त्या दुचाकी चोराचा शोध घेत आहेत.