नवी मुंबई : हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी लक्ष द्यावे. वाशी रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या इलेक्ट्रॉनिक इंटरलिंकिंग (ईआय) या अत्याधुनिक सिग्नल प्रणालीच्या स्थापनेसाठी मध्य रेल्वेने मोठ्या प्रमाणात लोकल सेवांमध्ये बदल केले आहेत. ५ ते ८ ऑगस्टदरम्यान घेण्यात आलेल्या रात्रीचा ब्लॉक नंतर, अंतिम टप्प्यातील कामासाठी आता ९ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ते १० ऑगस्टच्या सकाळपर्यंत तब्बल १० तासांचा विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे.

वाशी स्थानकावर ईआय प्रणाली लागू करण्यासाठीच हा विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. ही प्रणाली सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सिग्नल्स, पॉइंट्स (स्विचेस) आणि ट्रेनच्या मार्गाचा समन्वय साधते. त्यामुळे मानवी चुका कमी होतात, ट्रेन संचालन अधिक सुरक्षित व जलद होते आणि भविष्यात अधिक गाड्या चालवण्याची क्षमता वाढते. पारंपरिक रिले-आधारित यंत्रणेपेक्षा ही प्रणाली अधिक कार्यक्षम असल्याने रेल्वेने तिचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे.

५ ते ८ ऑगस्ट : रात्रीच्या सेवा बंद

या चार दिवसांत रोज रात्री १०.४५ ते पहाटे ३.४५ या वेळेत वाशी–पनवेल लोकल सेवा पूर्णपणे बंद राहिल्या होत्या. या काळात बेलापूर, वांद्रे आणि पनवेलहून सुटणाऱ्या काही शेवटच्या गाड्या केवळ वाशी, वडाळा रोड किंवा नेरूळपर्यंत धावल्या. पहाटेच्या वेळेत काही गाड्यांचे मार्ग बदलले गेले होते, तर काही सेवा पूर्णपणे रद्द करण्यात आल्या होत्या.

मात्र, इंटरलिंक सिग्नल प्रणालीचे अंतिम टप्प्यातील काम अद्याप पूर्ण न झाल्याने शनिवार, ९ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.४५ पासून रविवार, १० ऑगस्ट रोजी सकाळी १०.४५ पर्यंत वाशी स्थानकात विशेष मेगा वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे.

त्यामुळे पनवेलहून मुंबईकडे (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) येणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात काही बदल करण्यात आले असून, रात्री ११.४८ ची लोकल ही शेवटची लोकल असणार आहे. त्यानंतर पहाटे ४.०३ पासून सकाळी १०.१७ पर्यंतच्या सर्व गाड्या रद्द राहतील.

तसेच, मुंबईहून ( छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) पनवेलकडे जाणाऱ्या गाड्यांपैकी रात्री ११.३८ ची लोकल शेवटची असेल. त्यानंतर रात्री ११.५२ पासून सकाळी १०.०३ पर्यंतच्या सर्व गाड्या रद्द राहतील.

ठाणे–पनवेल ट्रान्स हार्बर मार्ग:

ब्लॉक संपल्यानंतर ठाणे–पनवेलची पहिली गाडी सकाळी १०.१५ वाजता, तर पनवेल–ठाणेची पहिली गाडी सकाळी १०.३३ वाजता सुटेल. या कालावधीत प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी–मानखुर्द–सीएसएमटी अशी विशेष लोकल सेवा चालवली जाईल.असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले असून, प्रवासाचे नियोजन करताना या बदलांचा विचार करावा आणि गोंधळ टाळण्यासाठी आधीच वेळापत्रक तपासावे. असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना करण्यात आले आहे.