सर्वसाधारणपणे एका नागरिकाला दिवसाला १४० ते १६० लिटर पाणी लागते असे मानण्यात येते. मात्र पिण्याच्या पाण्याची सुबत्ता असलेल्या नवी मुंबईत मुबलक पाणी मिळत असल्याने एक नवी मुंबईकर दिवसाला २३६ लिटर पाणी वापरत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. देशात पाण्याची एवढी नासाडी इतर कोणत्याही शहरात होत नसल्याचे स्पष्ट आहे. मराठवाडा, विर्दभसारख्या भागात एक हंडाभर पाण्यासाठी नागरिक वणवण भटकत असताना नवी मुंबईत मात्र पाण्याचा कमालीचा अपव्यय होत आहे. नवी मुंबईतील पाणी घोटाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत गेला आहे, परंतु त्याच्या चौकशीचे घोडे मध्येच अडले आहे. त्यामुळे मोरबे धरणापासून येणारे पाणी नागरिकांच्या नळापर्यंत जाताना अनंत अनियमितता, घोटाळे करण्यात आलेले आहेत. एकीकडे गुरुत्वाकर्षणाने पाणीपुरवठा केला जातो, असे मोठय़ा अभिमानाने सांगितले जात आहे आणि दुसरीकडे उच्चस्तरीय जलकुंभांचे वीजदेयक व दुरुस्ती यांच्या नावाखाली कोटय़वधी रुपयांची कामे काढली जात आहेत. या सर्व कामात गेली कित्येक वर्षे अधिकाऱ्यांची एक मोठी साखळी गुंतलेली आहे. मोरबे धरणातून दररोज ४२० दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा केला जात असून, त्याचा शहरात गेल्यानंतर हिशेब लागत नाही. नागरिक वापरत असलेल्या पाण्यातील ८० टक्के पाणी हे सांडपाण्याच्या रूपातून टाकले जाते. नवी मुंबईत हे पाणी केवळ १९० दशलक्ष लिटर आहे. नवी मुंबईत मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे आहेत हे जगजाहीर झाले आहे. त्या घरांना देण्यात आलेल्या जोडण्यांची देयके निघत नसल्याने या सेवेवरील खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. उपलब्ध पाणी आणि वापरातील पाण्याचा मेळ लागत नसल्याने या पाणी प्रकरणाची एकदा तरी चौकशी व्हावी, अशी मागणी केली जात आहे.
पाण्याची काटकसर करण्याची सवय नसलेल्या नवी मुंबईकरांकडून होणारा पाण्याचा अपव्यय चर्चेचा विषय होऊ लागला आहे. मुबलक पाणी असणाऱ्या या शहरात दररोज माणशी २०० लिटर पाणी वापरले तरी समजण्यासारखे होते, पण थेट २३६ लिटर पाणी वापरले जात असल्याने हा चिंतेचा विषय झाला आहे. दरवर्षी सप्टेंबपर्यंत मोरबे धरण ८८ एमसीएलपर्यंत भरत असल्याचा अनुभव आहे, मात्र ते आता ७९ एमसीएल पर्यंत भरले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai waste lot of water
First published on: 23-09-2015 at 07:23 IST