पुढील महिन्यात होणाऱ्या नवी मुंबई पालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील करावे येथील नगरसेवक विनोद म्हात्रे आणि तुर्भे येथील नगरसेविका शुभांगी पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. याचा अंतिम निर्णय माजी मंत्री गणेश नाईक पुढील आठवडय़ात घेणार आहेत. ज्येष्ठ नगरसेवक जे. डी. सुतार यांच्यावर सभागृह नेतेपदाची जबाबदारी असल्याने त्यांचे नाव मागे पडले आहे, तर नगरसेविका अपर्णा गवते यांनी दिघा येथील इमारती वाचाव्यात यासाठी पती नवीन गवते यांच्यासह विरोधी पक्षांची कास धरल्याने त्यांच्या नावाला पक्षातूनच विरोध दर्शविला गेला आहे. यात गवते यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे.
सोळा सदस्य संख्या असलेल्या नवी मुंंबई पालिकेच्या स्थायी समितीची गेले एक वर्षभर नेरुळच्या नगरसेविका नेत्रा शिर्के यांनी चांगली धुरा सांभाळली होती. २० वर्षांच्या पालिका लोकप्रतिनिधी इतिहासात त्या पहिल्या महिला सभापती ठरल्या आहेत.
टक्केवारीच्या गर्तेत अडकलेली स्थायी समिती काही अंशी वर काढण्यात शिर्के यांना यश आले होते. त्यामुळे त्यांच्याकडे पुन्हा पालिकेची तिजोरी सोपविली जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती; मात्र सदस्यसंख्या वाढलेल्या सभागृहातील राष्ट्रवादीच्या प्रत्येक सदस्याला येत्या चार वर्षांत एखादी समिती देण्याची व्यूहरचना नाईक यांनी आखली आहे. त्यानुसार शिर्के यांना पुन्हा संधी न देता बुधवारी पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक गुरखे, संगीता पाटील, छाया म्हात्रे, लक्ष्मीकांत पाटील, शुभांगी पाटील या नवीन सहा सदस्यांना संधी दिली आहे. यातील माजी दिवंगत सभापती व नाईक यांचे एके काळचे कट्टर विरोधक डी. आर. पाटील यांची कन्या शुभांगी पाटील यांच्या हाती तिजोरीच्या चाव्या पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर माजी महापौर सागर नाईक यांचे सासरे विनोद म्हात्रे यांच्या नावाचाही विचार केला जाऊ शकतो.
गवते यांचा पत्ता कट
अभ्यासू आणि नगरसेवक झाल्यानंतर वकिलीचे शिक्षण पूर्ण केलेल्या दिघा येथील नगरसेविका अपर्णा गवते यांच्या नावाची स्थायी समिती सभापती पदासाठी गेली अनेक वर्षे चर्चा आहे. मात्र दिघा येथील बेकायदा बांधकाम प्रकरणात त्यांचे पती नवीन गवते यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार असून दिघावासीयांची ही घरे वाचवीत यासाठी या दाम्पत्याने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची कास धरल्याने राष्ट्रवादीच्या गोटात त्यांच्या नावाला विरोध आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या एक तर पुन्हा महिलेच्या हाती जातील किंवा नातेवाईकांच्या माध्यमातून तिजोरीवर देखरेख ठेवणे नाईक यांना शक्य होणार आहे. नवी मुंबई पालिकेची तिजोरी दोन हजार कोटी रुपयांची असल्याने यावर वर्णी लागावी यासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.
