उरण : मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरुवात झाली असून करंजा बंदरातील मासळी बाजाराला सुरुवात झाली आहे. या बाजारात गतवर्षी ५०० तर यावर्षी ६०० कोटींच्या मासळीची विक्रमी उलाढाल होण्याची अपेक्षा मच्छिमारांनी व्यक्त केली आहे. १ ऑगस्ट पासून सुरू झालेल्या मासेमारीच्या नव्या हंगामात घाऊक बाजारात २० बोटीतून आलेल्या दोन कोटींच्या मासळीची विक्री केली जात असल्याची माहीती करंजा मच्छिमार संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी दिली आहे. १५ ऑगस्ट २०२४ ला स्वातंत्र्य दिनी नव्याने निर्माण झालेल्या करंजा मच्छीमार बंदरातून मासळी विक्री सुरू झाली आहे. या दोन महिन्याच्या कालावधीत बंदरातून ५० कोटींच्या ५०० टन मासळीची निर्यात झाली होती. यात यावर्षी वाढ झाली आहे.
करंजा बंदरातील मासळी ही मासळी अमेरिका,चीन थायलंड तसेच आशिया व युरोप खंडातील अनेक देशात निर्यात करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मासळी बंदर आणि त्यावर आधारित विविध प्रकल्पांमुळे करंजा परिसरात विविध प्रकारच्या छोट्या-मोठ्या लघु उद्योगात वाढ होत चालली आहे.त्यामुळे येथील स्थानिक बेरोजगारांना बऱ्यापैकी रोजगारही उपलब्ध होऊ लागला आहे. मुंबईच्या ससून बंदराला पर्याय म्हणून उरणच्या करंजा येथे नवे मच्छिमार बंदर उभारण्यात आले आहे. त्यामुळे येथील मच्छिमारांना लाभ झाला आहे. त्याच बरोबरीने स्थानिकांच्याही व्यवसायात भर पडली आहे.
अरबी समुद्र किनाऱ्यावर द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याशी करंजा गाव सात पाड्यात वसलेले आहे.३० हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या चाणजे ग्रुप ग्रामपंचायत कार्यरत आहे.१७ सदस्य असलेली सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे.प्रामुख्याने कोळी बांधवांचीच सर्वाधिक वस्ती आहे.यामुळे मासेमारी व्यवसाय करणे ओघाने आलेच.मोठ्या प्रमाणावर पारंपारिक पध्दतीने व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांमुळे राज्यातील सात सागरी जिल्ह्यातील सर्वात मोठे मच्छीमार करंजा गाव म्हणून ओळखले जाते.
राज्यातील सर्वाधिक सुमारे ६५० मच्छीमार बोटी याच करंजा गावात मासेमारी करतात.राज्यातील सर्वात मोठी मच्छीमार सहकारी संस्थांही करंजातच आहे.वार्षिक सुमारे १०० कोटींची उलाढाल असलेल्या या मच्छीमार संस्थेच्या माध्यमातून डिझेलमागे एक पैसा आणि बर्फाच्या विक्रीमागे एक रुपया विकास निधी वसुल करुन शाळा, हॉस्पिटलची उभारणी केली आहे. मच्छीमारांसाठी लागणारे साहित्य किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्यासाठी दुकानही सुरू करण्यात आली आहेत.
अशा सर्वाधिक मासेमारी करणाऱ्या करंजा मच्छीमारांच्या शेकडो बोटी मासळी उतरविणे, विक्रीसाठी मुंबईतील एकमेव ससुनडॉक बंदराच्या आश्रयाला जात होते.त्यामुळे ससुनडॉक बंदरावरील वाढता ताण लक्षात घेऊनच करंजा येथेच उपयुक्त जागेत सुमारे ३०० कोटी खर्चाचे एक हजार मच्छीमार बोटी क्षमतेचे अद्यावत करंजा मच्छीमार बंदर उभारण्यात आले आहे. त्यामुळे हे करंजा बंदर हजारो मच्छीमारांसाठी वरदान ठरले आहे.यामुळे रोजगार, व्यवसायांची संधीही वाढत आहेत.याआधीच मच्छीमारांसाठी आवश्यक लागणारे साहित्य पुरविण्यासाठी जाळी,रंग,सामान पुरवठा करणारे हार्डवेअर,२०-२५ वर्कशॉप्स,जाळींची दुकाने आहेत.करंजा येथुन काही वर्कशॉप्समध्ये तयार करण्यात येणारे मच्छीमार बोटींसाठी लागणारे पंखे,टनट्युब, सॉफ्ट आदी यांत्रिक साहित्याला थेट विदेशातून मोठी मागणी आहे.असे यांत्रिक साहित्य विदेशात पाठवले जाते.
स्थानिक युवकांनी सुरू केला निर्यात व्यापार :
करंजा मच्छिमार बंदरावर आधारित उद्योग म्हणून येथील स्थानिक तरुणांनी दुसऱ्यांवर अवलंबून न राहता स्वतः मासळी निर्यातीचा व्यवसाय सुरू केला आहे. या माध्यमातून निर्यातदारांसाठी मासळी खरेदी करून येथील मासळी जगातील विविध देशात निर्यात केली जात आहे.
निर्यात मासळीचे प्रकार :
मकोल,सुरमई, बांगडा,समुद्री कोळंबी व बगा (रिबन फिश) आदी प्रकारच्या मासळीची मोठया प्रमाणात निर्यात केली जात आहे.
करंजा मासळी बाजारात उत्साह :
करंजा बंदरात खोल समुद्रात मासेमारी करून आलेल्या बोटी नांगर टाकू लागल्या आहेत. त्यामुळे बोटीतून आलेली मासळी उतरवून ती घाऊक बाजारात विक्री केली जात आहे. त्यासाठी खरेदीदारानीही गर्दी केली आहे. तर दुसरीकडे मासेमारी बोटी पुन्हा एकदा रवाना करण्याची तयारी सुरू असून त्याची लगबग ही दिसत आहे.