नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर सुधाकर सोनवणे यांना दहा कोटी रुपयांची मागणी करणारा आणि नवी मुंबईची रेल्वे स्थानके व कोकण भवन उडवून लावण्याच्या धमकीचे पत्र लिहिणाऱ्या सुशिक्षित तरुणाला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

सूरज नाव असलेला हा तरुण ठाणे येथील राहणारा असून तो सानपाडा येथे एका कंपनीत नोकरीस आहे. सूरजने लिहिलेले हे पत्र शनिवारी महापौर सोनवणे यांना मिळाल्यानंतर हे पत्र लिहिणाऱ्याचा शोध सुरू झाला. तब्बल एक लाख पत्रांमधून हे पत्र लिहिणाऱ्यापर्यंत पोलीस पोहोचले आहेत. या तरुणाचे नाव गुप्त ठेवण्यात आल्याची माहिती नवी मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दिलीप सावंत यांनी दिली. संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी अटक केलेल्या या तरुणाचे हस्ताक्षर तपासण्यात आले आहे. हे पत्र याच तरुणाने लिहिले आहे का, यासाठी हस्ताक्षरतज्ज्ञांची मदत पोलीस विभाग घेत आहेत.