यादवनगर, ऐरोलीतील ‘वॉक विथ कमिशनर’मध्ये आयुक्तांचे आवाहन
शासनाकडून विविध प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करताना नागरिक म्हणून आपलेही काही सामाजिक कर्तव्य आहे याची जाणीव नागरिकांनी ठेवली पाहिजे, याकरिता चुकीचे काही करणार नाही व चुकीचे होऊ देणार नाही असा वैचारिक बदल नागरिकांनी स्वत:मध्ये घडवायला हवा, असे आवाहन नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. यादवनगर, ऐरोली येथील वॉक विथ कमिशनर उपक्रमाप्रसंगी ते रहिवाशांशी संवाद साधत होते.
महानगरपालिका नागरी सुविधा पुरविण्याची आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत आहे, त्यावेळी नागरिकांनीही त्या सुविधांचा योग्य वापर करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यादृष्टीने रस्त्यावर कुठेही कचरा न टाकणे, ओला व सुका असा वेगवेगळा ठेवणे आणि महापालिकेच्या कचरा गाडीतही वेगवेगळा टाकणे, आपल्या गाडय़ा योग्य ठिकाणी पार्क करणे, शौचालयांचा योग्य प्रकारे वापर करणे असे नियम पाळावेत, असे आवाहन त्यांनी केले.
पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन गरजेपुरतेच पाणी वापरावे असे आवाहन करत नवी मुंबई महानगरपालिका २००० पूर्वीच्या झोपडय़ांना वैयक्तिक पाणी जोडणी देत असून याकरिता केवळ महापालिकेची झोपडपट्टी सर्वेक्षण पावती व आधार कार्ड हे दोनच पुरावे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शौचालय बांधण्यासाठी १७ हजार इतके अनुदान दिले जात असून जास्तीत जास्त नागरिकांनी शौचालय बांधून घ्यावे, असे ते म्हणाले.
अवघ्या ११ तक्रारी
यादवनगर परिसर झोपडपट्टीचा असल्यामुळे या कार्यक्रमात अनेक तक्रारी येण्याची शक्यता होती, मात्र फक्त ११ तक्रारी आल्या. या प्रभागात मोठय़ा प्रमाणात बेकायदा बांधकामे असून २००० नंतरच्या झोपडय़ांची संख्या प्रचंड आहे. यावर आपणच अंकुश ठेवला पाहिजे, अशी हाक मुंढे यांनी यादवनगरमधील रहिवाशांना दिली.
