पालिकेकडून निविदा; काँक्रीटीकरण करणार

संतोष जाधव, नवी मुंबई 

राजकीय अडसर आल्याने शीव-पनवेल महामार्गाला समांतर उरण- तुर्भे रस्त्याची खड्डय़ांमुळे बिकट अवस्था झाली आहे. हा रस्ताच खड्डय़ात गेल्याचे चित्र आहे. यातून आता प्रवाशांची सुटका होणार आहे. या रस्त्याचा कॉंक्रीटीकरणाची निविदा पालिकेने दुसऱ्यांदा काढली असून लवकरच हे काम सुरू करण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले. ३८ कोटींचा खर्च करून २० मीटर लांबीचा दोन लेनचा रस्ता बनवण्यात येणार आहे.

शीव-पनवेल महामार्गावरील खड्डे हा विषय चांगलाच ऐरणीवर आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभगाने या मार्गावरील डांबरीकरण असलेल्या ठिकाणी कॉंक्रीटीकरणाचे काम सुरू केले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील मंदावलेला वेग आता गती घेणार आहे. मात्र या महामार्गाला समांतर असलेला उरण फाटा ते तुर्भे रस्त्यावरची परिस्थिती आता बिकट झाली आहे. पावसाळयानंतर दुरुस्ती न झाल्याने खोल खोल खड्डे पडले आहेत. उरण फाटय़ापासून एमआयडीसी क्षेत्रात असलेल्या या ४ किमी मार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. दुचाकीस्वारांच्या पोटात तर रस्त्यांची अवस्था पाहूनच धस्स होतं, तर चारचाकी वाहनांना होडीत बसल्याचा अनुभव मिळत आहे. उरण फाटय़ापासून ते नेरुळ एलपी तसेच शिवाजीनगरपासून पुढे तुर्भे एस. के.व्हील शोरूमपर्यंत मोठे मोठे खड्डे पडले आहेत.

या रस्त्याच्या कामसाठी पालिकेने प्रस्ताव केला होता, परंतु स्थायी समितीमध्ये तो फेटाळण्यात आला होता. त्यामुळे काम काही महिन्यांपासून रखडले होते. आता पुन्हा निविदा मागवण्यात येवून एकच निविदा प्राप्त झाली आहे. त्यामुळे आता हे काम लवकरच संबंधित ठेकेदाराला देण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या अभियंता विभागाने दिली.

उरण फाटा ते तुर्भे एस.के.व्हील शो रूमपर्यंतच्या रस्ता अत्यंत खराब झाला असून त्याच्यावर खड्डे पडले आहेत. या ठिकाणचे काम लवकरात लवकर करण्यात येणार आहे.

-सुरेंद्र पाटील, शहर अभियंता

या रस्त्याच्या प्रस्तावाला विरोध झाला होता. त्यामुळे प्रशासनाने नव्याने निविदा प्रक्रिया राबवली असून एकच निविदा प्राप्त झाली आहे. नियमानुसार या रस्त्याचे काम करण्यात येणार आहे.

 -डॉ.रामास्वामी एन.,आयुक्त नवी मुंबई महापालिका