चौगुले, मोरे यांचे परस्परांवर टीकास्त्र

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई महापालिकेच्या स्थायीसमिती सदस्य निवडीवरून शिवसेनेत सुरू झालेल्या यादवीचा पहिला अंक बुधवारी संपला असला तरीही अंतर्गत धुसफूस सुरूच आहे. नगरसेवकांच्या राजीनाम्याचे केवळ नाटक होते. त्यांनी दिलेले राजीनामे दाखवा आणि माझा राजीनामा घ्या, असे आव्हान चौगुले यांनी नाहटा गटातील विठ्ठल मोरे यांना दिले आहे, तर मी गटारात दगड मारत नाही तर गटारच साफ करतो, असा टोला मोरे यांनी लगावला आहे. त्यामुळे शिवसेना नेत्यांनी कलगीतुऱ्याला अधिकच रंग चढला आहे.

विरोधी पक्षनेते विजय चौगुले व उपनेता विजय नाहटा यांच्या भांडणात चौगुले यांची सरशी झाली. चौगुले यांच्या मर्जीतील दोन सदस्यांची नावे कमी करण्यात आल्याने हा गट काहीसा नाराज असला तरी नाहटा गटाच्या मागणीनुसार चौगुले, भगत आणि भोईर यांच्या उमेदवारीला धक्का न लागल्याने बंडाचा झेंडा फडकवून नाहटा गटाच्या हाती काहीच लागले नाही. स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत होणाऱ्या घोडेबाजारात घोडे खरेदी करणाऱ्यांची ताकद बघून मातोश्रीने चौगुले यांच्या गटाला झुकते माप दिल्याची चर्चा आहे. शिवसेनेतील या ठिणगीच्या मागे कोपरखैरण्यातील एका चतुर नगरसेवकाचा हात असल्याचे सांगितले जाते.

नवी मुंबई महापालिकेतील १११ नगरसेवकांत शिवसेनेचे ३८ नगरसेवक आहेत. राष्ट्रवादीने काँग्रेस व अपक्षांच्या मदतीने सोनावणे यांना महापौरपदी बसवले असले, तरीही शिवसेनेने स्थायी समिती आणि महापौरपदही पालिकेतील स्वत:कडे खेचून आणण्याची तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्थायी समिती सदस्य निवडीत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले अधिकार वापरून पाच नावांची यादी जाहीर केली. त्याला उपनेते विजय नाहटा यांनी विरोध केला आणि मोरे यांच्या माध्यमातून राजीनामानाटय़ रंगविले. त्यामुळे शिंदे यांच्यापर्यंतच मर्यादित असलेला हा वाद ‘मातोश्री’पर्यंत पोहोचला. ठाण्यात तक्रार नेणाऱ्या नगरसेवकांना शिंदे यांनी चांगलाच दम भरला होता. त्यामुळे नाहटा यांनी हे प्रकरण ‘मातोश्री’वर लावून धरले. त्यात शिंदे यांनी सुचवलेल्या दोन नावांवर काट मारण्यात आली, मात्र नाहटा यांना ज्या नावांवर काट मारणे अपेक्षित होते, ती चौगुले आणि भगत यांची नावे कायम ठेवली.

आर्थिक निकष?

स्थायी समिती सभापतिपदासाठी केला जाणारा घोडेबाजार आर्थिकदृष्टय़ा सक्षम असणारे चौगुले आणि भगत करू शकतील, हा निकष लावण्यात आल्याची चर्चा आहे. शिवसेनेत दुफळी माजविण्याचे काम कोपरखैरणेतील पक्षबदलात पटाईत नगरसेवकाने केल्याचे सांगितले जाते. हा नगरसेवक शिवसेनेला रामराम ठोकण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीच्या शिरवणे व ऐरोलीतील नगरसेवकांनीही वादाच्या या ठिणगीला हवा देण्याचे काम केल्याचे समजते.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nmmc standing committee nmmc shiv sena vijay chougule vitthal more
First published on: 28-04-2017 at 00:39 IST