राज्य शिक्षण मंडळाच्या इंग्रजी शाळाही नवी मुंबई महापालिका सुरू करणार

संतोष जाधव, लोकसत्ता

नवी मुंबई</strong>: सीवूड्स सेक्टर ५० व कोपरखैरणे सेक्टर ११ येथे  महापालिकेच्या सीबीएसईच्या शाळा सुरू असून या शाळांची वाढती मागणी व प्रतिसाद पाहता नवी मुंबई महापालिकेने शहरात सीबीएसई व एसएससी इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढवण्यात येणार असल्याचे संकेत दिले असून, याबाबत धोरणात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

एकीकडे राज्यभरात मराठी माध्यमाच्या शाळांची पटसंख्या हा चिंतेचा विषय झालेला असताना दुसरीकडे नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मात्र दरवर्षी महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शहरात प्रशासनाने सीबीएसई तसेच एसएससी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये वाढ करण्यात येणार असल्याची तयारी सुरू केली आहे.

नवी मुंबई शहरात खासगी व महापालिकेच्या मिळून एकूण ३०० पेक्षा अधिक शाळा आहेत. तर नवी मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या सीवूड्स व कोपरखैरणे येथील सीबीएसई शाळेची मागणीही वाढली असल्याचे चित्र आहे.

शहरात असलेल्या खाजगी शाळांची फी सर्वसामान्य व मध्यमवर्गीय पालकांना डोईजड होत आहे. तर दुसरीकडे पालिकेने सुरू केलेल्या सीबीएसई शाळेतही खासगी शाळांच्या तुलनेत चांगले शिक्षण मिळत असल्याने महापालिकेनेही इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढवण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत.      

नवी मुंबई महापालिकेने सीवूड्स सेक्टर ५० येथील भूखंड क्रमांक ५४  येथे करोडो रुपये खर्च करून तीन मजल्यांची देखणी इमारत शाळेसाठी उभारली आहे. तसेच कोपरखैरणे येथेही करोडो रुपये खर्चाची पालिकेची इमारत वापराविना पडून होती. त्यामुळे नागरिकांच्या कररूपी पैशातून पालिका करोडोंचा खर्च करून वास्तू उभारते व वापराविना इमारती धूळखात पडून ठेवत असल्याचा आरोप पालिकेवर करण्यात येत होता. त्यामुळे  तत्कालीन पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन यांनी पुढाकार घेत २०१८ पासून सीबीएसई शाळा सुरू केल्या होत्या. सीवूड्स येथील शाळा एका खासगी संस्थेच्या वतीने चालवण्यात येत आहे. तर कोपरखैरणे येथील शाळा पालिकेच्यामार्फतच चालवण्यात येत आहे. दोन्ही शाळांमध्ये मुलांना मोफत शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे शहरात इंग्रजी माध्यमांच्या शाळांची मागणी वाढली असून इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढवणार असल्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. याबाबत पालिका आयुक्त व महापालिका शिक्षण, उपायुक्त यांच्या स्तरावर याबाबत कार्यवाही करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचे उपायुक्त  जयदीप पवार यांनी सांगितले  की, इंग्रजी माध्यमांच्या शाळा वाढवण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

७६ शाळा, ४० हजारहून अधिक विद्यार्थी

शहरात पालिकेच्या मराठी, इंग्रजी, हिंदूी, उर्दू, सीबीएसई अशा विविध माध्यमांच्या एकूण ७६ शाळा असून जवळजवळ ४० हजारपेक्षा अधिक विद्यार्थी महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत.

नवी मुंबई महापालिकेच्या सीबीएसई शाळेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच शहरात इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढवण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असून विभागवार इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढवण्याबाबत प्रशासन सकारात्मक आहे.  – अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

पालिकेच्या इंग्रजी माध्यम शाळा

* शाळा क्रमांक ९२ कुकशेत – विद्यार्थी

संख्या १२०६

* शाळा क्रमांक ९१ दिवा गाव –   १४०४

पालिकेच्या सीबीएसई शाळांमधील विद्यार्थी

* शाळा क्रमांक ९४  सीवूड्स –    ८७०

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

* शाळा क्रमांक ९३ कोपरखैरणे – ११३०