नवी मुंबई : नवी मुंबई पालिका क्षेत्रात दररोज निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते उद्योजकांना विकण्याच्या पालिका प्रकल्पाला शुक्रवार पासून प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात करण्यात आली. कोपरखैरणे येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रावरून सहा दशलक्ष लिटर पाणी तुर्भे येथील उद्योजकांना पुरवठा करण्यात आला आहे. पालिका हे पाणी १८ रुपये ५० पैसे प्रति घनलीटरने देणार आहे. यामुळे एमआयडीसी तील उद्योजकांना ४ रुपये फायदा होऊ शकणार आहे. अशा प्रकारे सांडपाणी विकणारी नवी मुंबई पालिका राज्यातील पहिली पालिका आहे.

हेही वाचा <<< अतिवृष्टीमुळे ‘इंडियन स्वच्छता लीग’ पुढे ढकलली; या तारखेला पालिकेचे आयोजन…

हेही वाचा <<< नवीन पनवेलचा जिवघेणा उड्डाणपुल

केंद्र सरकारच्या अमृत योजने अंतर्गत नवी मुंबई पालिकेने ऐरोली व कोपरखैरणे येथे दोन सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काम दोन वर्षांपूर्वी सुरू केले आहे. १३२ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पातील प्रक्रिया युक्त पाणी एमआयडीसी तील कारखानदारांनी विकत घ्यावे अशी अपेक्षा आहे. पाण्याचा जास्तीत जास्त पुनर्वापर व्हावा असे केंद्र सरकारने सर्व स्थानिक स्वराज्य संस्था ना कळविले आहे. त्यासाठी अमृत योजने अंतर्गत 50 टक्के अनुदान दिले जात आहे. नवी मुंबईतील कारखान्यांना बारवी धरणातून 45 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जात आहे. तो आता कमी जास्त होत असल्याने तक्रारी आहेत. त्याऐवजी पालिकेने प्रक्रिया केलेले पाणी ते ही एमआयडीसी पेक्षा स्वस्त दिले जाणार आहे. पालिकेच्या कोपरखैरणे प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून शुक्रवार पासून सहा कारखानदारांना हे पाणी देण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील हा पहिला प्रयोग आहे हे पाणी घेण्यास पहिल्यांदा कारखानदार नाखूष होते. पण राज्य शासनाने समज दिल्यानंतर हे पाणी कारखानादार विकत घेणार आहेत. यापूर्वी पालिकेने चार असे प्रकल्प राबविले आहेत. पण त्यातील पाणी पालिका उद्यान व एका मोठ्या सोसायटीला विकण्या व्यतिरिक्त उपयोग झाला नाही.