नवी मुंबई: आज दुपारी शीव  पनवेल मार्गावर नेरुळ उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात एक वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे. येथून जाणाऱ्या एका  ट्रक ने अचानक ब्रेक दाबल्याने मागून येणारे मिक्सर कंटेनरला धडकले त्यात मिक्सर चालक गंभीर जखमी झाला आहे. सदर अपघातामुळे सुमारे एक तास पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प होती.

आज अडीच तीनच्या दरम्यान शीव पनवेल मार्गावर नेरुळ उड्डाणपुलावरून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका  ट्रकने अचानक ब्रेक दाबला . मागून येणाऱ्या मिक्सर ट्रक चालकाला मात्र गाडी थांबवता न आल्याने मिक्सरने  ट्रकला मागून जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती कि मिक्सर समोरच्या बाजूने मोठे नुकसान झालेच शिवाय चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला डॉ. डी . वाय पाटील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>मुंबई- बडोदा द्रुतगती महामार्ग: माथेरान येथील बोगद्याचे दीड किमीपर्यंतचे काम पूर्ण

अपघात ग्रस्त दोन्ही गाड्या बंद पडल्या होत्या . त्यामुळे वाहतूक कोंडी प्रचंड झाली. त्यामुळे सदर अपघात ग्रस्त गाड्या उड्डाण पुलावरून खाली काढून रस्त्याच्या कडेला घेण्यास अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे शेवटी सर्वच मार्गिके वरील वाहतूक काही वेळ बंद करून दोन्ही गाड्या टोईंगने बाजूला काढून साडे तीनच्या सुमारास  वाहतूक सुरळीत करण्यात आली. गाड्या बाजूला करेपर्यंत  पूर्ण वाहतूक बंद न ठेवता उड्डाणपुलाखालून वाहतूक सुरु करण्यात आली. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे यांनी दिली.