scorecardresearch

कांदा पुन्हा साठीपार

सप्टेंबर महिन्यात राज्यभरात झालेल्या पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्य़ांत पूरस्थिती निर्माण झाली होती.

कांदा पुन्हा साठीपार
(संग्रहित छायाचित्र)

मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने किलोमागे दहा रुपयांची वाढ

मुंबई/नवी मुंबई : कांद्याची दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातबंदी करूनसुद्धा मुंबई, ठाण्यासह आसपासच्या शहरांत कांद्याच्या दरांनी साठी पार केली आहे. आवक कमी असल्याने कांद्याच्या दरात आठवडाभरात घाऊक आणि किरकोळ बाजारात किलोमागे १० रुपयांची वाढ झाली असून रोजच्या आहारातील इतरही भाज्या ६० ते ८० रुपयांच्या घरात असल्याने सामान्य माणसाचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

सप्टेंबर महिन्यात राज्यभरात झालेल्या पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्य़ांत पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पुणे आणि नाशिक जिल्ह्य़ांत कांदा साठवण चाळींमध्ये पाणी शिरल्याने कांद्याचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले होते. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने कांद्याचे भाव वधारले होते. कांद्याची दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणली होती. केंद्र सरकारच्या निर्णयानंतरही कांद्याचे भाव चढेच असल्याचे आढळून आले आहे. कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी नुकतेच देशांर्तगत बाजारपेठेत कांद्याचे भाव कमी होतील असे मत व्यक्त केले होते; परंतु कृषिमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतरही कांद्याच्या दरात घट होण्याची काही चिन्हे दिसत नाहीत.

आठवडाभरात कांद्याच्या दरात घाऊक आणि किरकोळ बाजारात १० रुपयांनी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या आठवडय़ात घाऊक बाजारात ३२ रुपयांना विकला जाणारा कांदा आता ४२ रुपये प्रति किलोने विकला जात आहे. तर किरकोळ बाजारात ५० रुपये प्रति किलोने विकला जाणारा कांदा ६० रुपये प्रति किलोने विकला जात आहे. वाशी आणि कल्याण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा जुन्नर, आंबेगाव आणि लासलगाव येथून येतो. वाशीतील कांदा-बटाटा विभागातून संपूर्ण मुंबई शहराला कांदा आणि बटाटय़ाचा पुरवठा केला जातो. पावसाळ्यापूर्वी वाशीत येणाऱ्या  कांद्याच्या १०० गाडय़ांची आवक आता ७० ते ७५ गाडय़ांवर येऊन ठेपली आहे. आवक कमी असल्याने परदेशातून कांदा आयात करावा लागत आहे. ‘राज्यातील कांद्याचे नुकसान झाल्याने इजिप्तवरून कांद्याची आयात करावी लागत आहे. इजिप्तवरून आयात केलेल्या कांद्याचा माल खराब आल्याने त्याला बाजारात उठाव नाही. सध्या नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये नवीन कांद्याचे पीक बाजारात आल्यावर कांद्याच्या दरात घट होण्याची शक्यता’ असल्याचे कांदा-बटाटा विभागाचे उपसचिव कृष्णकांत पवार यांनी सांगितले.

मागील वर्षी एपीएमसी बाजारात ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यांत १०० गाडय़ांपैकी ३०-४० गाडय़ा नवीन कांदा दाखल झाला होता; परंतु यंदा आवकीत घट झाली असून आता बाजारात ६० पैकी केवळ १० गाडय़ा नवीन कांदा तर ४०-५० गाडय़ा जुना कांदा दाखल झाला आहे. भिजलेला ओला कांदा दाखल होत असल्याने एक तो दीड दिवस टिकत आहे. त्यामुळे ग्राहक जुन्याच कांद्याला पसंती देत असून दरात वाढ होत आहे.

डिसेंबपर्यंत हीच परिस्थिती?

दिवाळीनंतर बाजारामध्ये नवीन कांदा दाखविण्यास सुरुवात होते, मात्र पावसामुळे नवीन कांद्याचे उत्पादन लांबणीवर पडले आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता नाही, असे मत घाऊक व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. ‘सततच्या पावसामुळे नवीन कांद्याची काढणी लांबणीवर पडली आहे. कांद्याचे उत्पादन काढण्यासाठी सुकी जमीन लागते,परंतु आता पावसाने जमिनीत ओलावा असल्याने कांदा तोडणी करण्यात येत नाही. त्यामुळे नवीन कांदा मोठय़ा प्रमाणात बाजारात दाखल होईपर्यंत बाजारात तेजी राहील,’ असे मत व्यापारी मयूरेश वामन यांनी व्यक्त केले.

इतर भाज्याही महाग

सध्या रोजच्या आहारातील पालेभाज्या आणि फळभाज्यांचे भावही चढेच आहेत.परतीच्या पावसाचा फटका बसल्याने अनेक भाज्या खराब झाल्या आहेत. बाजारात भाज्यांची आवक चांगली होऊनसुद्धा त्यांचे दर चढेच असल्याचे दादरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडईतील मधुकर सिंग या विक्रेत्याने सांगितले.

 

भाज्यांचे दर

                    घाऊक         किरकोळ    

भेंडी                ३६           ८०

फरसबी           ४०           ८०

फ्लॉवर            १४           ६०

गवार               ५०           १२०

कारली              ३०           ६०

शि. मिरची        ३६           ६०

वांगी                ३०           ६०

कोबी               २४           ६०

(दर रूपये प्रतिकिलो)

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या