पनवेल : धावत्या मर्सिडीज मोटारीच्या बोनटवर स्टंटकरुन रील चित्रीकरणासाठी तरुणीने स्टंटबाजी प्रकरण मर्सिडीज मोटार चालकाच्या चांगलेच अंगलट आले आहे. या तरुण चालकाचा वाहन चालविण्याचा परवाना लर्निंग असताना त्याने सहचालक न घेता अशा प्रकारे स्टंटबाजी करुन त्याच्या सहकारी तरुणीच्या जिवाला धोका निर्माण केल्यामुळे या तरुणा विरोधात खारघर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. ही घटना २० जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास सेक्टर ३४ येथील खारघरमधील प्रशांत कॉर्नर स्वीटमार्ट दूकानासमोरील मुख्य रस्त्यावर घडल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
समाजमाध्यमांवर ही रिल व्हायरल झाल्यावर खारघर पोलिसांनी बुधवारी रात्री याबाबत स्वता तक्रार नोंदवली. पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशय़ीत आरोपी अल्फेश आझम शेख ( वय २४, रा. साई वर्ल्ड एम्पायर, खारघर) याने एमएच १९ बीजे ७१९६ क्रमांकाची मर्सिडीज कार चालवताना त्याच्याकडे चालकाचा पक्का परवाना नसताना, गाडीवर ‘लर्निंग’चे चिन्ह न लावता आणि प्रशिक्षित चालकही बाजूला नसताना सार्वजनिक रस्त्यावर निष्काळजीपणे आणि हयगईने वाहन चालवले. विशेष म्हणजे, कारच्या बोनटवर त्याची सहकारी नाझमीन सुल्डे ही तरुणी स्टंट करत होती. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये मोठा संताप व्यक्त झाला होता.या प्रकारामुळे सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण झाला असून नागरिकांच्या जिवीतास सुद्धा गंभीर धोका निर्माण झाला होता, असे पोलिसांनी नमूद केले आहे.
अल्फेश याच्याविरोधात भादंवि कलम २८१, २८९, १२५, ११० तसेच मोटार वाहन कायदा कलम १८१, १८४ आणि मोटार वाहन नियमानूसार गुन्हा नोंदवला आहे. सध्या या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नसली तरी प्राथमिक तपास खारघर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र यमगर करीत आहेत. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांच्यासह पथकाने भेट दिली आहे. रिलसाठी व्हिडीओ तयार करून समाजमाध्यमांवर प्रसिद्धी मिळवण्याच्या हव्यासातून असे प्रकार वाढत असल्याची चिंता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबईत प्रशस्त व स्वच्छ रस्ते आणि येथील उंच इमारतींमुळे या परिसरात स्टंटबाजीकरुन रिल बनविणा-यांनी यापूर्वी सुद्धा प्रयत्न केला आहे. काही तरुणांनी मोटार गाड्या भरधाव वेगाने चालवून रस्त्यावर ‘ड्रिफ्टिंग’ व स्टंट करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकले होते. त्या प्रकरणांमध्ये सीवूड्स परिसरात वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. खारघर, पनवेल व खांदेश्वर या परिसरात काही वर्षांपूर्वी तरुणांनी दुचाकीवर स्टंट करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांच्यावर सुद्धा पोलिसांनी कारवाई केली होती. या स्टंटबाजीतून जिवीतहाणी किंवा अपघात टाळण्यासाठी पोलीस एकीकडे असे व्हीडीओ समोर आल्यावर गुन्हे दाखल करतात. काही प्रकरणात स्टंटबाजी करणारी मुले अल्पवयीन असल्यास पालकांना सुद्धा पोलीस ठाण्यात यावे लागते. पोलीस अशावेळी मुलांसह पालकांचे प्रबोधन करुन त्यांना प्रतिबंधक नोटीस बजावत असल्याचे सुद्धा समोर आले आहे.