हागणदारीमुक्त शहरासाठी पनवेलमध्ये ३३४ शौचालये बांधण्यात आली आहेत. नजीकच्या काळात २५० खासगी शौचालये नगर परिषदेच्या वतीने बांधण्यात येतील. शहरातील १६ ठिकाणच्या झोपडपट्टीवासीयांसाठी ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’अंतर्गत मोफत शौचालय बांधून देण्याची योजना आहे.
शहरातील सुमारे ३५०० झोपडय़ांमधील रहिवाशांचा आरोग्याचा प्रश्न यातून सुटणार आहे. ११२८ ठिकाणी खासगी आणि सार्वजनिक शौचालयांचे नियोजन करण्यात आले होते; मात्र जागेअभावी आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे ५९८ शौचालये बांधण्याचे निश्चित करण्यात आले. झोपडीत शौचालय उभारण्याएवढी जागा असावी, ही जागा बेकायदा असली तरी चालेल; परंतु संबंधित झोपडीपासून मलनिस्सारण वाहिनी जवळ असावी, अशी अट योजनेतील लाभार्थ्यांसाठी आहे.
आजवर नगर परिषदेच्या हद्दीत सुमारे एक कोटी रुपये खर्चून ३३४ खासगी आणि एकआसनी ४४७ शौचालये उभारली आहेत. यानंतर २६ ठिकाणी सार्वजनिक शौचालये उभारली जाणार आहेत. या योजनेत सामील होण्यासाठी झोपडपट्टीधारकांनी पॅनकार्ड, बँकेचे पासबुक आणि स्वत:चे फोटो आरोग्य विभागाकडे जमा करावेत.
यानंतर संबंधित विभागातील अधिकारी या झोपडीची पाहणी करतील. त्यानंतर १५ दिवसांत संबंधित झोपडपट्टीधारकाला मंजुरीपत्र देण्यात येईल. लाभार्थी झोपडपट्टीधारकाच्या बँक खात्यात सुरुवातीला सहा हजार रुपये आणि शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर १४ हजार रुपये जमा केले जातील. योजनेमधील अडचण योजनेच्या प्रमुख स्नेहा वंजारी यांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पथनाटय़ांची गरज
आंबेडकर पुतळ्याजवळील झोपडपट्टीधारक सकाळी घरात शौचालय असतानाही उघडय़ावर नैसर्गिक विधी आटोपतात. त्यामुळे झोपडपट्टीतील उत्तम आरोग्याचा प्रश्न तसाच कायम राहतो आहे. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमार्फत पथनाटय़ातून जनजागृती करण्याचा मानस आहे. परिणामी पनवेलची वाटचाल हागणदारी मुक्त शहर म्हणून होऊ शकेल, असे नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी स्पष्ट केले.