पनवेल – वर्षभरापासून कळंबोलीतील एक हॉटेलचालक वीज महावितरण कंपनीची वीज चोरी करत असल्याचे महावितरण कंपनीच्या तपासणीत उजेडात आले आहे. या हॉटेलचालकाने तब्बल ९ लाख ४८ हजाराची वीज चोरी केली असून या चोरीसाठी वीज मीटरला छिद्र सुद्धा पाडून मीटरमध्ये छेडछाड केली. या प्रकरणी कळंबोली पोलीस अधिक तपास करीत आहेत.
ग्रामीण पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात वीज चोरीचे गुन्हे महावितरण कंपनीने उघडकीस आणले. तरी पनवेलमधील विज चोरी थांबलेली नाही. या वीज चोरीमध्ये विविध राजकीय पक्षांचे स्थानिक नेत्यांचा सुद्धा समावेश आहे. गावपातळीवर होत असलेल्या वीज चोरीचे गुन्हे आता शहरी लोक वस्तीमधील व्यापा-यांकडून होत आहेत. रोडपाली येथील अमरांते गृहनिर्माण सोसायटीमधील दूकान क्रमांक ३८ येथे न्यू अजवा फॅमिली रेस्तरॉं आहे. याच हॉटेलचे १८ सप्टेंबरला वीज मीटर महावितरण कंपनीच्या भरारी पथकाने तपासणी केल्यावर ही बाब उजेडात आली.
महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता कपिल गाठले व तंत्रज्ञांनी केलेल्या तपासणीमध्ये हॉटेल न्यू अजवा यासाठी लागणारी वीज गेल्या वर्षी जून महिन्यापासून आतापर्यंत विज चोरी करण्यात आली होती. वीज मीटरच्या आर फेज सीटीला छिद्र पाडून मीटरमधील युनीटचे मोजमाप व्यवस्थित होऊ न देण्यासाठी हा सर्व खटाटोप हॉटेलचालकाने वीज तंत्रज्ञाच्या साह्याने केल्याचे उजेडात आले.
महावितरण कंपनीने वीज मीटर वापरकर्ते फवझान तल्हा बलवा याच्या विरोधात फौजदारी वीज चोरी केल्याबाबत गुन्हा नोंदवला आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदविल्यावर मंगळवारी पुढील तपासासाठी हा गुन्हा कळंबोली पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रणजित जाधव अधिक तपास करीत आहे. हॉटेलमालक फवझान याने वर्षभरात तब्बल ४१,७५० युनीट विज चोरी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.