पनवेल : दहिसर ते सावंतवाडी या पल्यावर धावणारी ओमकार ट्रॅव्हल्स कंपनीची बस पनवेल जवळील कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या उतरणीवर कलंडल्यामुळे बसमधील ३२ प्रवासी जखमी झाले तर ३० वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. रविवारी साडेनऊ वाजता ही घटना घडली. रात्रीच्या वेळी जवळच्या गावकऱ्यांसह पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेच्या साह्याने कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींना तीन लहान मुलांचा समावेश आहे.
या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव अमोल कृष्णा तळवडेकर असे आहे. अमोल हा राजापूर तालुक्यातील कोंडाये गावचा राहणारा होता. पनवेल तालुका पोलिसांनी बस अपघात करुन फरार झालेल्या बस चालकाला ताब्यात घेतले आहे. चालकाकडे पोलीस चौकशी करत आहेत. अमोल यांच्यासोबत त्यांची पावणेदोन वर्षांची भाची प्रवास करत होती. ती सुद्धा अपघातामध्ये जखमी झाली.
ओमकार ट्रव्हलस कंपनीची दहिसर ते सावंतवाडीला जाणारी खासगी ट्रॅव्हल्स बसमधून (कंमाक एम.एच ४७ वाय ७४८७) प्रवास करीत असताना प्रवाशांनी चालकाला व्यवस्थित बस चालविण्याची सूचना केली होती. तरी ही बसचालक भरधाव वेगाने बस चालवित असल्याचा आरोप बस प्रवाशांनी रविवारी केला. बसमधील जखमी प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी बचाव दलाला रविवारी रात्री शर्थीचे प्रयत्न करावे लागले. या अपघातामध्ये प्रवासी गंभीर व किरकोळ जखमी असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांनी दिली.
वरीष्ठ पोलीस निरीक्षक घाडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री अपघात झाल्याची माहिती समजताच सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्यासह वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाता मधील जखमींना मदतकार्य आणि वाहतूक कोंडी सोडविण्याचे काम पहिल्यांदा सुरू झाले. जखमी प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी रस्त्यावरुन इतर वाहनातील प्रवाशांनी संवेदनशील नागरिकांची भूमिका निभावली. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस कर्मचा-यांना इतर प्रवाशांनी मदत करून बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना एकामागोमाग एक बसच्या पुढच्या फुटलेल्या काचेतून सुखरुप बाहेर काढले. सहा रुग्णवाहिकांमधून तातडीने प्रवाशांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात पाठविण्यात आले. जखमी ३२ पैकी २८ रुग्ण सोमवारी सकाळी रुग्णालयात उपचार घेत असून १९ प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. बसचालक नरेंद्र मोहीते उर्फ सूरज याला पोलिसांनी अटक केली आहे.