महापौरपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गाकडे

पनवेलचे महापौरपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित झाल्यामुळे चार महिन्यांपासून महापौरपदाचे स्वप्न बाळगून विविध सामाजिक व राजकीय कार्यक्रमांत मग्न असलेल्या पनवेलच्या ठाकूर व म्हात्रे या दोन्ही घराण्यांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. कामोठे येथील प्रभाग क्रमांक ११ व १३ आणि खारघर येथील प्रभाग क्रमांक ६ हे तीन प्रभाग अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित असल्यामुळे तेथील लढती लक्षवेधी ठरणार आहेत. अन्य प्रभागांतूनही या प्रवर्गातील उमेदवार देण्यासाठी सर्वपक्षीयांची चाचपणी सुरू झाली आहे.

शुक्रवारी मुंबईत २७ महानगरपालिकांच्या महापौरपदाची सोडत काढण्यात आली. पनवेलमध्ये या पदावर अनुसूचित जातीतील महिलेला संधी मिळाल्यामुळे या प्रवर्गाच्या नेत्यांनी समाधान व्यक्त केले, मात्र पनवेलमध्ये वर्चस्व असलेल्या ओबीसी समाजाच्या बडय़ा नेत्यांकडे नेतृत्व जाण्याच्या शक्यता मावळल्यामुळे निवडणुकीत ‘रसद’ कोण पुरविणार याचीच चर्चा दिवसभर होती. पनवेल महापालिकेच्या २० प्रभागांमध्ये ७८ सदस्यांपैकी तीन जागा या अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. कामोठे येथील प्रभाग क्रमांक ११, १३ याचसोबत खारघर येथील प्रभाग क्रमांक ६ मध्ये चुरशीच्या लढती होण्याची चिन्हे आहेत. काही दिग्गजांनी याच जागांवर आपली वर्णी लागावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचना सोडतीनंतर इच्छुक उमेदवारांनी राजकीय पक्षश्रेष्ठींचा कौल घेण्यापूर्वीच आपआपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ज्यांचे खिसे गरम आहेत त्यांनी विविध कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली आहे. हळदीकुंकू, सत्यनारायण पूजा, वार्षिक दिनदर्शिका वाटप, देवदर्शन सहली, पर्यटन सहली, कॅरम व विविध क्रीडा स्पर्धा, सामाजिक मेळावे अशा कार्यक्रमांतून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. इच्छुकांचे लक्ष महापौरपदाच्या शुक्रवारच्या सोडतीवर होते. पनवेल परिसरात मोठय़ा प्रमाणात ओबीसी लोकसंख्या आहे. त्यामुळे पहिल्या महापौरपदाचा मान आपल्याच समाजाकडे असावा, अशी भावना या मंडळींची होती. त्यामुळे भाजपचे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी भाजपची बैठक घेऊन आपले पुत्र परेश ठाकूर यांच्या उमेदवारीची चर्चा घडवून आणली. असेच काहीसे प्रयत्न शेकापचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांनीही स्वत:चे पुत्र प्रीतम म्हात्रे यांच्यासाठी केले. परंतु शुक्रवारी अपेक्षाभंग झाल्यामुळे या निवडणुकीत विजयी झाल्यावर पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या तरी ओबीसी नेत्यांच्या हातात राहाव्यात यासाठी बडे नेते प्रयत्नशील राहणार असल्याचे कळते. स्थायी समितीचे सभापतीपद ओबीसी समाजाच्या नेत्याकडेच राहावे अशी व्यूहरचना करण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय जनता पक्षाच्या राजकीय गोटात चर्चा आहे.

जि.प. अध्यक्षपदाचा बहुमान यापूर्वी रोडपाली येथील कविता जगदीश गायकवाड यांना मिळाला आहे. जगदीश गायकवाड यांच्याकडे आरपीआयचे जिल्हाध्यक्षपद असल्याने व ते ठाकूर यांच्या निकटवर्तीयांपैकी असल्याने त्यांनी भाजप व आरपीआय युतीमधून कामोठे परिसरातून काम सुरू केले आहे. ठाकूर समर्थक प्बिनेदार व आहिरे यांचीही नावे चर्चेत आहेत. भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी होत असताना शेकापमध्ये खारघरमधील प्रभाग ६ मधून उषा अडसूळ यांच्या उमेदवारीची चर्चा आहे.