आरोग्य विभागाच्या बैठकीत पालिका आयुक्तांच्या सूचना
पनवेल : शहरात ११ दिवसात १३१ जणांचा करोना मृत्यू झाल्याने पालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. पालिका आयुक्तांनी आरोग्य विभागाची बैठक घेत शहरातील सर्व रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या अत्यवस्थ रुग्णांची दररोज माहिती घेण्याच्या सूचना दिल्या असून मृत्यू होणाऱ्या प्रत्येक रुग्णाची कारणमीमांसा करण्यात येणार आहे.
कोणत्या रुग्णालयात करोनाचे रुग्ण उपचारादरम्यान दगावतात याची माहिती संकलित करण्याचे काम करोना मदत कक्षाकडून करण्यात येणार आहे. मृत्यूचे नेमके कारण काय, खासगी रुग्णालये असली तरी त्यांना पालिका काय मदत करू शकते याची चाचपणी पालिका मुख्यालयात गुरुवारी पालिका आयुक्तांनी आरोग्य विभागाची बैठक घेत केली.
पनवेल पालिका क्षेत्रातील रुग्णसंख्या ५३ हजारांवर पोहचली आहे. साडेतीन हजारांवर रुग्ण आजही पनवेलमध्ये उपचार घेत आहेत. ९३४ जणांचा आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झाला असून यामध्ये सर्वाधिक बळी नवीन पनवेल परिसरातील आहेत.
या परिसरातील २२४ तर कामोठे येथील २१६ जणांचा मृत्यू करोना उपचारादरम्यान झाला आहे. ५३ हजार करोना रुग्णांपैकी ४८ हजारांहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण कमी होत असले तरी मृत्यूंत वाढ होत आहे, ही पनवेलकरांसाठी चिंतेची बाब आहे.
लक्षणे आढळल्यास विनाविलंब डॉक्टरांचा सल्ला घ्या!
बैठकीत केलेल्या चर्चेतून लक्षणे असणारे रुग्ण वेळीच डॉक्टरांचा सल्ला किंवा उपचार घेत नसल्याने मृत्यू वाढत असल्याचे पालिकेचे आरोग्य विभागाचे उपायुक्त संजय शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी लक्षणे आढळल्यास तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालयात व वैद्यकीय सेवा देणाऱ्या फिरत्या मोबाइल व्हॅनमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे संपर्क साधावा असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.
