पनवेल : खारघर उपनगराच्या मध्यवर्ती भागी असणाऱ्या सेक्टर २७ येथे मलमिश्रित पाण्यामुळे अनेक ग्रामस्थांना अतिसार झाल्याच्या तक्रारी वाढल्या. हे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये बुधवारी प्रसिद्ध झाल्यावर पनवेल महापालिकेच्या आयुक्तांनी तातडीने याची दखल घेत गावात घरोघरी आरोग्य सर्वेक्षण हाती घेतले. तसेच गावकऱ्यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पालिकेने नियोजन केल्याची माहिती ग्रामस्थ उमेश चौधरी यांनी दिली. आरोग्याची आपत्ती भेडसावल्यावर पालिकेने तातडीने उचललेल्या पावलांमुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

जलवाहिनीतील गळतीमुळे मलमिश्रीत पाणी घरोघरी पुरवठा झाल्यामुळे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने मागील दोन दिवसांपूर्वी गावाची मुख्य जलवाहिनी बंद करुन इतर वाहिनीची तपासणी हाती घेतली. पाच मजूर यासाठी गावात काम करत आहेत. पालिकेने बुधवारी सकाळपासून रुग्णवाहिका आणि डॉक्टरांचे एक पथक औषधांसहीत गावात तैनात केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अतिसारामुळे नागरिकांना अशक्तपणाच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे पालिकेच्या डॉक्टर व त्यांच्या पथकाने अनेक रुग्णांची घरोघरी जाऊन तपासणी केल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. रांजणपाडा या गावातील ग्रामस्थांना सिडको मंडळाच्या आणि पनवेल पालिकेकडून दोन संस्थांच्या पाणी पुरवठ्याच्या दोन वेगवेगळ्या जलवाहिनीतून पाणी पुरवठा केला जातो. सिडकोकडून येत असलेल्या जलवाहिनीतून दूषित पाणी आल्याने हा घोळ झाल्याचे बुधवारी सकाळी तपासणी दरम्यान उघडकीस आले. त्यानंतर जलवाहिनीवरील दुरुस्तीचे काम सिडको मंडळाने हाती घेतले.