नगर परिषदेच्या हस्तांतरित शाळांकडे दुर्लक्ष

पनवेल : पनवेल पालिका होऊन चार वर्षे उलटली तरी अद्याप पालिका प्रशासनाला शैक्षिणिक धोरणच आखता न आल्याने एकही शाळा नव्याने सुरू करता आली नाही. तर पूर्वीच्या नगर परिषदेच्या ताब्यातील ११ शाळा हस्तांतरित केल्या असून त्यांचा शैक्षणिक दर्जा वाढीसाठीही काही प्रयत्न होताना दिसत नाहीत. जिल्हा परिषद शाळांच्या हस्तांतरणाचा प्रश्न प्रलंबितच आहे. त्यामुळे पालिकेवर खासगी शाळांना पोषक वातावरण निर्माण करून देत असल्याचा आरोप होत आहे.

पनवेल पालिकेने मागील चार वर्षे वर्षपूर्तीचे मोठे सोहळे दिमाखदार केले. मात्र आरोग्य व शिक्षण या मूलभूत बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. करोनाकाळात पोलिकेने आरोग्य व्यवस्था न उभारल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयात पदरमोड करावी लागल्याचे समोर आले आहे.

पनवेल शहर व तालुक्यात सध्या ५६२ शाळा व महाविद्यालये आहेत. यात दोन लाख आठ हजार विद्यार्थी शिकत आहेत. यापैकी पनवेल शहरात नगर परिषदेच्या पालिकेकडे हस्तांतरित झालेल्या अकरा शाळा तर रायगड जिल्हा परिषदेच्या २४८ शाळा आहेत. म्हणजे शहर व तालुक्यात ३०३ शाळा या खासगी शाळा आहेत. यात पनवेल पालिकेत फक्त ११ नगर परिषदेच्या व ५३ जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. यात जिल्हा परिषदेच्या ५३ शाळा या अद्याप हस्तांतरित केलेल्या नाहीत.

म्हणजे पालिकेच्या स्वमालकीच्या नगर परिषद हद्दीतील ११ शाळांमध्ये १५०० विद्यार्थी शिकत आहेत. मात्र त्यांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी गेल्या चार वर्षांत दुर्लक्ष झाल्याने पूर्वीची पटसंख्याही कमी झाली आहे. यात पालिका स्थापान झाल्यापासून एकाही नव्या शाळेची भर पडलेली नाही. तळोजा परिसरात सर्व शाळा बेकायदा (अनधिकृत ) आहेत. रायगड जिल्हा परिषद दरवर्षी ही यादी जाहीर करते. हा परिसर मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. त्यात सिडकोच्या महागृहनिर्मितीमुळे येथील लोकसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे. मात्र या परिसरात एकही सरकारी शाळा नाही. असे असताना या ठिकाणी गेल्या चार वर्षांत नव्याने पालिका  शाळा उभारली गेली नाही, याबाबतही संताप व्यक्त होत आहे.

पालिका हद्दीत असून जिल्हा परिषदेच्या ५३ शाळा या हस्तांतरित न केल्याने रायगड जिल्हा परिषदेच्याच ताब्यता आहेत. गेली चार वर्षे ही हस्तांतरणाची प्रक्रिया अद्याप सुरूच आहे. या शाळांतील शिक्षक हस्तांतरित करण्याचा तिढा आहे.

खासगी शाळांना पायघडय़ा

पनवेल परिसरात नागरीकरण मोठय़ा प्रमाणात वाढत असून दरवर्षी खासगी शाळा नव्याने सुरू होत आहेत. शहर व तालुक्यात ३०३ शाळा या खासगी शाळा आहेत. यात अनेक लोकप्रतिनिधींच्या शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे शासकीय शाळांसाठी कोणी पाठपुराव करताना दिसत नाही. त्यामुळे पालिका सुरू झाल्यानंतर शाळांची संख्या वाढून शैक्षणिक दर्जा वाढेल ही पनवेलकरांची अपेक्षा पूर्ण झालेली नाही.

जिल्हा परिषदेच्या शाळा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. पालिकेने ठेवलेल्या अटीपैकी ५३ शाळांमधील शिक्षकांचे समायोजन करण्यास करण्यास जिल्हा परिषद तयार झालेली आहे. लवकरच जागामालकांशी बोलणी करण्यात येणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षभरात नवे शैक्षणिक धोरण तयार होऊन प्रत्यक्षात कार्यवाही झालेली पाहायला मिळेल.

-संजय शिंदे, उपायुक्त, पनवेल पालिका