तात्पुरत्या दालनाची प्रशासनाकडून व्यवस्था

पनवेल महापालिकेच्या महापौरपदी डॉ. कविता चौतमोल यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून महापौरपदाचे कामकाज त्यांच्या घरातूनच सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाने युद्धपातळीवर महापौरांसाठीचे दालन उभारण्याचे काम हाती घेतले असून, या दालनाचे काम पूर्ण होईपर्यंत शुक्रवारपासून पालिका इमारतीतच महापौरांचा कारभार तात्पुरत्या दालनातून सुरू होणार आहे.

१० जुलैला डॉ. कविता चौतमोल यांनी पनवेलच्या महापौरपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर अर्धा दिवस विजयी मिरवणुकीत गेला. त्यानंतर नवीन पनवेल येथील प्रचार कार्यालयात अनेकांकडून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी रीघ लागली होती. पहिला दिवस शुभेच्छा स्वीकारत झाला. मात्र मागील दोन दिवसांपासून भारतीय जनता पक्षाच्या  कार्यालय आणि घरातूनच कामकाज पाहात आहेत. त्यामुळे प्रसारमाध्यमांकडून महापौरांना हक्काचे दालन कधी मिळणार, अशी विचारणा होत आहे.

उपायुक्तांचे दालन महापौरांसाठी

शुक्रवारी पालिकेमध्ये महापौरांच्या दालनाची तात्पुरती सोय म्हणून यापूर्वी पालिकेचे उपायुक्त मंगेश चितळे हे बसत असलेल्या पहिल्या मजल्यावरील दालनामध्ये महापौरांचा कारभार सुरू होणार आहे. पालिकेच्या नवीन इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर चार विविध दालनांचे काम सुरू आहे. या दालनांचे काम पुढील पाच दिवसांत पूर्ण होईल. या दालनांमध्ये महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेता यांचीही दालने असणार आहेत. तसेच याच मजल्यावर २५ व्यक्ती एकाच वेळी बसू शकतील, अशा सभागृहाचेदेखील काम सुरू आहे. यासाठी पालिकेने सुमारे ७० लाख रुपये खर्च केले आहेत.