पनवेल – महापालिकेच्या व्यापारी संकुलामध्ये उभी केलेली दुचाकी रविवारी सकाळी चोरी झाल्यानंतर काही तासांत ही दुचाकी पनवेल रेल्वेस्थानकाजवळील रस्त्यावर अनोळखी चोरट्याने उभी केलेली सापडली. वाहन चोरांच्या या नव्या शक्कली मागील सूत्रधाराचा शोध पनवेल शहर पोलीस घेत आहेत. यापूर्वीही एकदा अशाच प्रकारे चोरीची दुचाकी या रस्त्यावर सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पनवेल शहरातील रहिवासी आणि महापालिकेतील एक कर्मचारी यांना प्रशिक्षणाच्या कामासाठी पनवेल शहरात नेमल्यामुळे रविवारी सकाळी १० वाजून पाच मिनिटांनी त्यांनी त्यांची दुचाकी फडके नाट्यगृहाच्या शेजारील व्यापारी संकुलाच्या वाहनतळात उभी करून ते कामावर निघून गेले. दुपारी सव्वा वाजता पुन्हा दुचाकीकडे आल्यावर त्यांना दुचाकी सापडली नाही. त्यामुळे त्यांनी सर्वत्र शोधाशोध केली. मात्र दुचाकी न सापडल्याने त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले.

शहरात वाहनचाेरीचे प्रकार वाढल्याने वाहनांची सूरक्षा हा महत्वाचा मुद्दा रहिवाशांसाठी बनला आहे. चोरट्यांनी मात्र यावेळी महापालिकेच्या व्यापारी संकुलातील वाहनाला लक्ष्य केल्यामुळे महापालिकेच्या व्यापारी संकुलाची सूरक्षा सुद्धा एेरणीवर आली आहे.

रविवारी चोरीस गेलेल्या दुचाकीचा शोध पनवेल रेल्वे स्थानक रस्त्यावरील वाहनतळात घेण्याचा सल्ला एका नागरिकाने दिल्यामुळे त्या परिसरात दुचाकी शोधल्यानंतर तेथील रस्त्यावर दुचाकी बेवारस उभी असल्याची आढळली.

याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील वाघ यांना माहिती मिळाल्यावर शहरातून रेल्वे स्थानकापर्यंत ही चोरीची दुचाकी येथे कोणी ठेवली याविषयी तांत्रिक तपास सुरू केला आहे. चोरी झालेल्या दुचाकीमध्ये महापालिका कर्मचा-याचे निवडणूक विभागाचे काही कागदपत्र आणि महापालिकेचे ओळखपत्र चोरट्यांनी पळवले.