नवी मुंबई : कोपरखैरणे येथील महानगरपालिकेची सीबीएसई शाळा क्रमांक ९४ मध्ये , शाळा सुरू होऊन ही गेल्या सहा महिन्यांपासून विद्यार्थी आणि पालक लवकरच शिक्षक उपलब्ध होतील या आशेवर होते. मात्र शाळेचे पहिले सत्र अखेरच्या टप्यात आले असून तरी देखील आद्यप विद्यार्थ्यांना शिक्षकांची प्रतिक्षा करावी लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सोमवारी पालकांनी नवनियुक्त आयुक्तांना निवेदन देऊन लवकरात लवकर शिक्षक नियुक्ती करावी नाहीतर आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येईल, असा ईशारा निवेदनातून दिला आहे.

कोपरखैरणे येथील महानगरपालिकेच्या सीबीएसई शाळेत १२५० विद्यार्थ्यांमागे केवळ १० शिक्षक आहेत. त्यामुळे विद्यार्थी संख्या जास्त आणि शिक्षक कमी , एका वर्गाला ही एक शिक्षक उपलब्ध होत नसून १०० विद्यार्थ्यांना शिकवावे लागत आहे. शाळा सुरू झाली तेव्हा पासून शिक्षक तेवढेच राहिले मात्र दरवर्षी वर्ग, तुकड्या, पट संख्या वाढत आहे. मागील दोन वर्षांच्या कालावधीत ऑनलाइन शाळा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना कमी शिक्षकांची अडसर वाटली नाही तसेच शाळा प्रशासनाला आहे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांची कमतरता भासली नाही, मात्र आता ऑफलाईन शाळा सुरू झाल्यापासून १२५० विद्यार्थ्यांना १० शिक्षक अपुरेच आहेत.

हेही वाचा : पदभार स्वीकारताच आयुक्त राजेश नार्वेकरांनी घेतला विविध कामांचा आढावा

परिणामी ६ तासांच्याऐवजी शाळा ३ तास भरवली जात असून विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमच पूर्ण शिकवून होत नसून त्यांच्या इतर ऍक्टिव्हिटीज देखील पूर्णपणे ठप्प असून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासही खुंटत आहे. त्यामुळे अखेर पालकांनी आयुक्तांना निवेदन देऊन लवकरात लवकर ही शिक्षकांची समस्या मार्गी लागावी अन्यथा महापालिका मुख्यालय समोर महापालिका सीबीएसई शाळेचे पालक विना शिक्षकांची शाळा आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून दिला आहे.