सेक्टर-१७ मध्ये वाहनचालक बिनघोर; कारवाईसाठी पालिकेची यंत्रणाच नाही
वाशी सेक्टर-१७ मधील रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्या चारचाकी आणि दुचाकी चालकांकडून तासाला अनुक्रमे १०० आणि ५० रुपयांचा दंड आकारण्याच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोहिमेचा जवळपास फज्जा उडल्याचे स्पष्ट झाले आहे. या परिसरात अत्यावश्यक पार्किंग करणाऱ्यांकडून जास्तीचे शुल्क आकारण्यासाठी पालिकेने दंडाची पावतीच बनवली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शिस्त न पाळणाऱ्या चालकांना पार्किंगसाठीच्या वाढीव शुल्काचा केवळ फलक उभारून चाप लावण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. सध्या दंडाची भीती न बाळगता वाहनचालक वाहने उभी करीत आहेत.
वाहनचालकांसाठी पालिकने अरेंजा सर्कल ते शिवाजी चौक या ठिकाणी वाहनतळ उभारले आहे; मात्र चालकांनी तळाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे रस्त्याकडेला वाहने उभी केल्याने वाहतूक कोंडी कायम आहे. याचा सर्वात मोठा फटका पादचाऱ्यांना बसत आहे. आठवडाभरापूर्वी फलक लावण्यात आले आहेत; परंतु त्या ठिकाणी वाहने उभी करणाऱ्या चालकांकडून दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी पावती पुस्तिका न छापल्याने, तसेच दंडवसुलीसाठीची यंत्रणाच उभारली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्या केवळ रस्त्याकडेला फलक लावण्यात आले आहेत. शहरात वाहतुकीची सोय लावण्यासाठी पालिकेने विशेष सुविधा उभारली नसताना केवळ गर्दी आणि मोक्यांची ठिकाणे हेरून पालिका चालकांकडून दंडात्मक कारवाई करीत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.
पालिकेच्या शिवाजी चौक ते अरेंजा सर्कल अशा ४०० मीटर वाहनतळात वाहने उभी केली जात नाहीत. येथे दिवसभरात केवळ २०० ते २५० वाहनेच पार्क करीत असल्याची माहिती येथील सुरक्षारक्षकांनी दिली. दुचाकीसाठी तासाला दहा रुपये आणि चारचाकीसाठी २० रुपये आकारत असल्याचे सांगितले.
महापालिकेच्या अधिकृत वाहनतळांबाबत चालकांमध्ये जनजागृतीची गरज आहे. पालिकेच्या अतिरिक्त दंडाचा केवळ फलक चालकांच्या मनात भीती निर्माण व्हावी यासाठी लावण्यात आला होता.
दंडात्मक कारवाई करण्यासाठी पावती पुस्तिका लवकरच छापण्यात येईल आणि दोन दिवसांत कार्यवाही सुरू करण्यात येईल, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान येथील काही सुजाण नागरिकांनी वाहने हटविण्याची मागणीही केली आहे.