उरणमधील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच नियमित प्रवासी यांना नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या (एनएमएमटी)  सवलतीच्या बस पासेसचे वितरण उरण शहरात करावे अशी मागणी ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थी व प्रवाशांनी केली आहे. सध्या सवलतीचा पास घेण्यासाठी येथील प्रवाशांना वाशी किंवा तुर्भे आगार गाठावे लागत असल्याने ते त्रासाचे ठरते, याकडे लक्ष वेधून प्रवाशांनी ही मागणी केली आहे. उरण ते नवी मुंबई दरम्यान एनएमएमटी बसेसमधून दररोज २५ हजारांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करीत आहेत.  अनेक विद्यार्थी, चाकरमानी एनएमएमटीचे पासधारक आहेत. उरणमधील ८०० पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात पास दिला जातो. हा पास तीन वर्षांकरिता दिला जातो. मात्र असे असले तरी ज्येष्ठ नागरिकांना आपला पास काढण्यासाठी नवी मुंबईत जावे लागत आहे.त्यामुळे उरणमध्येच एनएमएमटीच्या पासची व्यवस्था करण्याची मागणी उरणच्या ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष काटदरे यांनी केली आहे. त्याचप्रमाणे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एस.एफ.आय.) या विद्यार्थी संघटनेनेही विद्यार्थ्यांना उरण शहरातच पास देण्याची सोय करण्याची मागणी केली आहे.या संदर्भात नवी मुंबईतील एनएमएमटीच्या बस आगाराशी संपर्क साधला असता स्थानिक आमदार तसेच नगरपालिकेला बस आगारासाठी कार्यालय तसेच सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र त्याची अमंलबजावणी न झाल्याने बस नियंत्रणाचे काम करणाऱ्यांना अंधारात काम करावे लागत आहे, अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने दिली.