पनवेल-सीएसएमटी मार्गावरील प्रवाशांचे हाल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहराच्या विविध भागांत बुधवारी रास्ता रोको व रेल रोको करण्यात आल्यामुळे नवी मुंबईतील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. शीव-पनवेल महामार्गावर, सानपाडा व वाशी परिसरात रास्ता रोको करण्यात आला. हार्बर रेल्वे विस्कळीत झाली होती. मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर रेल्वेमार्गावरील आंदोलनांचाही फटका नवी मुंबईकरांना बसला. त्यामुळे कार्यालयात निघालेल्यांचे हाल झाले.

दुपारी अकारानंतर रेल्वेसेवा विस्कळीत झाली आणि प्रवाशांचा खोळंबा सुरू झाला. मानखुर्द ,चेंबूर व गोवंडी येथे रेल रोकोमुळे वाशी-पनवेल मार्ग विस्कळीत झाला. अनेकांना गाडय़ांच्या खोळंब्यामुळे कार्यालयात पोहचता आले नाही.

वाशी चौकात रास्ता रोको करण्यात आला. सानपाडा दत्तमंदिर परिसरात शीव-पनवेल मार्गावर रास्ता रोको करण्यात आला. त्यावेळी सानपाडा पोलिसांनी बंद करणाऱ्यांना तात्काळ परत पाठवले. तुर्भे येथे रेल रोको व इंदिरानगर परिसरात रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे रस्त्यावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली. नेरुळमध्ये शांततेत बंद पाळण्यात आला. रेल्वे बंद पडल्यामुळे काहींना गाडय़ांत तर काहींना कार्यालयांत अडकून पडावे लागले.

एनएमएमटी, रिक्षाही बंद

ऐरोली, वाशी, कोपरखरणे, घणसोली येथे एनएनएमटीच्या डेपोमध्ये शुकशुकाट होता. सकाळ पासूनच परिवहनच्या बस बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. बंदमुळे एनएमएमटीला २८ लाखांचा तोटा सहन करावा लागला. रिक्षा थांब्यांकडे मोर्चा वळवणाऱ्यांचाही विरस झाला. सर्वच ठिकाणी रिक्षा बंद होत्या. रस्त्यांवर रिक्षा तुरळक होते, परिणामी नवी मुंबईकरांना घरापासून रेल्वे स्थानकांपर्यंत आणि अंतर्गत भागांतही पायपीट करावी लागली.

शहरात पोलिसांनी चोख व्यवस्था केली होती. काही ठिकाणी रास्ता रोको व रेल्वे रोको करण्यात आला. परंतु परिस्थिती नियंत्रणात होती. पोलिसांनी तणावाची स्थिती योग्य पद्धतीने हाताळली.

डॉ. सुधाकर पाठारे, उपायुक्त, परिमंडळ १

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passenger suffered problem due to the bhima koregaon violence effect
First published on: 04-01-2018 at 01:47 IST