डेंग्यू तपासणी किटअभावी रुग्णांना भुर्दंड

नवी मुंबई पालिकेने नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा देण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च करून देखणी रुग्णालये उभारली. मात्र अपुऱ्या सुविधांमुळे ही रुग्णालये केवळ शोभेपुरतीच उरली आहेत. या सर्व रुग्णालयांपैकी त्यातल्या त्यात बऱ्या स्थितीत असणाऱ्या वाशीतील सार्वजनिक रुग्णालयांतही आता साहित्याअभावी रुग्णांची फरपट होऊ लागली आहे. क्ष-किरणतपासणीसाठी वापरण्यात येणाऱ्या फिल्म संपल्या आहेत. शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असताना डेंग्यूच्या तपासणीसाठी आवश्यक किट्स संपले आहेत.

वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालय नेहमीच गैरसोयींमुळे वादात असते. कधी क्ष-किरण यंत्र बंद, कधी नवजात शिशू तपासणी प्रणाली बंद, कधी उद्वाहन बंद असे प्रकार वरचेवर घडत असतात. कोणत्या विभागातील यंत्रणा कधी बंद पडेल हे सांगता येत नाही. याबाबत पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारले असता, रुग्णालयाच्या देखभाल दुरुस्तीची सर्वसमावेशक निविदाच काढली नसल्यामुळे असे प्रकार घडत असल्याचे त्यांनी सांगितले. वाशीतील रुग्णालयात अनेक दिवसांपासून क्ष-किरण तपासणीसाठी वापरण्यात येणारी फिल्म संपली आहे. तिचा पुरवठा करण्यात आला नसल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे क्ष-किरण तपासणी केल्यानंतर तिचा संगणकीय अहवाल दिला जात आहे. रुग्णांना त्याची प्रत हवी असल्यास, ती रुग्णाच्या मोबाइल फोनवर पाठवली जाते, मात्र पालिकेच्या रुग्णालयांत येणाऱ्यांत आर्थिक दुर्बल गटातील रुग्णांची संख्या मोठी असते. त्यांच्याकडे स्मार्टफोन आणि त्या फोनमध्ये इंटरनेटची सुविधा नसते. अशा स्थितीत त्यांना स्वत:चा क्ष-किरण अहवाल पाहायलाही मिळत नाही.

गेल्या वर्षी शहरात डेंग्यूसदृश आजारांचे ८५२ रुग्ण आढळले होते. त्यातडेंग्यूचे पॉझिटिव्ह २४ रुग्ण होते. यंदा हे प्रमाण कमी असेल तरी ताप काही दिवस न उतरल्यास डॉक्टर तात्काळ डेंग्यू तपासणी करण्याचा सल्ला देत आहेत. ही तपासणी कमी खर्चात व्हावी म्हणून वाशी रुग्णालयात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे, मात्र या तपासणीसाठी आवश्यक किटच रुग्णालयात उपलब्ध नसल्यामुळे त्यांना खासगी प्रयोगशाळांत अधिक खर्च करून तपासण्या करून घ्याव्या लागत आहेत. रक्ताच्या तपासण्या करणारे बायो केमिकल अ‍ॅनालायझर यंत्र अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे या रुग्णांना खासगी रुग्णालयांत तपासण्या करून घ्याव्या लागत आहेत.

पालिकेच्या रुग्णालयात डेंग्यूची तपासणी मोफत होते. तीच तपासणी करण्यासाठी खासगी प्रयोगशाळांता हजार किंवा त्यापेक्षा अधिक रुपये मोजावे लागतात. पालिकेने वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात फक्त विशेष तपासण्या करण्यासाठी ‘वेल स्प्रिंग’ या संस्थेची नेमणूक केली आहे. परंतु रुग्णालयात वारंवार साहित्य संपते. अशा स्थितीत या संस्थेचा उपयोग काय, संस्थेचे खिसे भरण्याचा तर हा प्रकार नाही ना, असा प्रश्न रुग्ण करत आहेत.

पालिका रुग्णालयातून क्ष-किरण तपासणीच्या प्रती दिल्या जात नाहीत. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या फिल्म संपल्या आहेत, डेंग्यू तपासणीचे किटस् संपले आहेत. हे सर्व साहित्य रुग्णालयाने बेलापूर येथील पालिकेच्या मेडिकल स्टोअरमधून नेणे आवश्यक आहे. ते तात्काळ पाठवण्यात येईल. रुग्णालयातील देखभाल दुरुस्तीची सर्वसमावेशक निविदाच काढण्यात न आल्यामुळे अनेक अडचणी येत आहेत. त्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

– डॉ. दीपक परोपकारी, वैद्यकिय आरोग्य अधिकारी, नमुंमपा

विभागातील एक रुग्ण वाशी संदर्भ रुग्णालयात दाखल झाल्यामुळे त्याची भेट घेण्यासाठी गेलो. तिथे क्ष-किरण तपासणीच्या फिल्म संपल्याचे कळले. त्यामुळे मोबाइल फोनवर फिल्म घेण्यास सांगण्यात येत आहे. पालिका रुग्णालयात सामान्य रुग्ण येत असताना कोटय़वधींचा खर्च करून रुग्णांना मात्र योग्य सेवा दिल्या जात नाहीत हे मोठे दुर्दैव आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिले पाहिजे.

– राजेंद्र आव्हाड, परिवहन सदस्य, नमुंमपा