दोन गटांतील संघर्षांनंतर बाजारपेठा, शाळा बंद, पोलीस बंदोबस्तात वाढ

नवी मुंबई सकल मराठा मोर्चाच्या वतीने बुधवारी पुकारण्यात आलेल्या बंदच्या पाश्र्वभूमीवर कोपरखैरणेत बुधवारी सायंकाळी दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. यानंतर हा तणाव मध्यरात्रीपर्यंत कायम होता. शिवसेनेचे नगरसेवक शिवराम पाटील यांच्या कार्यालयाची मोडतोड करण्यात आली. याच वेळी आगरी-कोळी युथचे संदीप पाटील यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. या वेळी हॉटेलांवर दगडफेक करून प्रचंड नासधूस करण्यात आली.

कोपरखैरणे सेक्टर-१९ मध्ये जमावाकडून सुमारे दीडशेच्या आसपास चारचाकी वाहनांची मोडतोड करण्यात आली. येथील तीन टाकी परिसरात तीन मोठय़ा हॉटेलांवर दगडफेक करण्यात आली. सेक्टर-१०मधील अनेक दुकानांची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी तणाव कायम होता. गुरुवारी पाच वाजल्यानंतर जनजीवन सुरळीत होऊ  लागले. रात्री येथील दुकाने उघडण्यात आली. या परिसरातील बहुतांश शाळांना गुरुवारी सुट्टी जाहीर करण्यात आली होती.

मराठा आंदोलन दुपारी अडीचनंतर सर्वत्र स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली. मात्र कोपरखैरणेत सायंकाळनंतर आंदोलन अधिक चिघळले. माथाडी कामगार नेते आमदार नरेंद्र पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. मात्र संतप्त जमावाने थेट त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यामुळे संरक्षणासाठी त्यांनी डी मार्ट पोलीस चौकीत आसरा घेतला. मात्र जमावाने चौकीला आग लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही तरुणांनी चौकीसमोरील पोलिसांच्या वाहनांना आगी लावल्या. नरेंद्र पाटील यांना पोलीस बंदोबस्तात घटनास्थळावरून नेण्यात आल्यानंतरही उशिरापर्यंत हिंसक जमावाने मोडतोड सुरूच ठेवली. या वेळी जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. त्यांना रोखण्यासाठी अखेर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या.

बेभान झालेल्या काही तरुणांच्या गटाने तीन टाकी चौकातील हॉटेलची मोडतोड केली. याच वेळी शिवसेनेचे नगरसेवक शिवराम पाटील यांच्या कार्यालयात घुसून नासधूस केली. या वेळी जमावाने शिवराम पाटील यांच्या घराच्या आवारातील आलिशान वाहनेही जाळली. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला पांगवले.

शिवराम पाटील यांच्या कार्यालयास शिवसेना उपनेते विजय नाहाटा, नवनिर्वाचित बेलापूर आणि ऐरोली मतदार संघाने अध्यक्ष विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, एम. के. मडवी, परिवहन समिती सदस्य समीर बागवान आदी शिवसेनेच्या नेत्यांनी भेट दिली. पाटील यांच्या कार्यालयावर हल्ला केल्या प्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आहे.

दुकाने पुन्हा बंद

मराठा आरक्षण मागणीच्या बंदला कोपरखैरणेत वेगळेच वळण मिळाल्याने आंदोलनाच्या आडून आपली राजकीय पोळी भाजून घेतली जात असल्याची चर्चा झडत आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत रात्रभर चोख बंदोबस्त ठेवला होता. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे दुकाने उघडण्यात आली. साडे दहानंतर काही दुकाने उघडण्यात आली. मात्र काही तासांनी रिक्षा आणि दुचाकीवरून आलेल्या काही तरुणांनी हॉर्न वाजवत दुकाने बंद ठेवण्याची सक्ती केली. त्यामुळे काही मिनिटांतच बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद झाली.

कडक पोलीस बंदोबस्त

सदर आंदोलन आणि कोपरखैरणे राजकीय वैमनस्यातून करण्यात आलेला हल्ला हे प्रकरणे हाताळण्यात पोलिसांनी धीमे पणा केल्याचा आरोप सर्वत्र होत आहे.आज दुपार पर्यत या आंदोलनाविषयी कुठलीही माहिती पोलिसांनी देण्यास नकार दिला तर आयुक्त उपायुक्त सहाय्यक आयुक्त यांनीही नकार दिला. आज कोपरखैरणे पोलीस ठाण्याला पोलीस महानिरीक्षक के. के. माथुर, आयुक्त हेमंत नगराळे यांनी भेट घेत आढावा घेतला. त्यामुळे सुरवातीला सहज घेतले गेलेल्या आंदोलन किती चिघळले याची चर्चा खुद्द पोलीस ठाण्यातच होत होती. प्रसिद्धी माध्यमांच्या अनेक प्रतिनिधींनी मोबाईलवर संदेश पाठवल्या नंतर आज दुपारी साडेचारला आयुक्त हेमंत नगराळे यांनी परिस्थिती बाबत माहिती घेतली.

मारहाणीत एक जण गंभीर जखमी

बुधवारी रात्री कोपरखैरणे गावात काही युवकांना बेदम मारले त्यात एकाचा मृत्यू झाला असल्याची अफवा सर्वत्र पसरली होती. पोलिसांनीही या बाबत ठोस माहिती देण्यास नकार दिल्याने संभ्रम वाढला होता. पोलीस विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार रात्री पाच ते सहा युवकांना अज्ञात युवकांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यातील एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती दिली.

आंदोलन चिघळू नये यासाठी कळंबोली आणि कोपरखैरणेत अश्रुधूर आणि हवेत गोळीबार करण्यात आला, तर काही ठिकाणी लाठीमारही करण्यात आला. या वेळी १२ पोलीस अधिकारी, ७ पोलीस जखमी झाले आहेत. गुरुवारी सकाळी कळंबोली जंक्शन येथे पंप अ‍ॅक्शन तोफा फायरिंग आणि रबर बुलेट फायरिंगमध्ये दोन जण जखमी झाले. सध्या नवी मुंबईतील परिस्थिती शांत आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.

-हेमंत नगराळे, पोलीस आयुक्त, नवी मुंबई</strong>

माथाडी वर्गाशी माझे जुने ऋणानुबंध आहेत. त्यांनी हे कृत्य केलेले नाही. हे कृत्य ठरवून करण्यात आले आहे. हा भ्याड हल्ला आहे.

शिवराम पाटील नगरसेवक शिवसेना