उपजिल्हा रुग्णालयातील शिपायाचा मृत्यू

पनवेल : करोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून मनुष्यबळ कमी असल्याने पडेल ते काम करणारे पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील शिपाई सुरेश गुरव या करोना योद्धय़ाची करोनाशी सुरू असलेली लढाई अखेर संपली. ते करोनाबाधित झाल्याने दोन आठवडय़ांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. आरोग्य विभागातील ते करोनाचा पहिला बळी ठरले आहेत.

सुरेश बाळू गुरव (वय ५०) असे या करोनायोद्धय़ाचे नाव आहे. पनवेलच्या ग्रामीण रुग्णालयापासून ते उपजिल्हा रुग्णालय सुरू होईपर्यंत त्यांनी पनवेलमध्येच पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ काम केले. शिपाई पदावर असूनही रुग्णसेवेसाठी मनुष्यबळाची कमतरता असल्याने गुरव हे रुग्णसेवा देण्यासाठी हिरिरीने पुढे येत असत. पनवेलमधील साईनगर परिसरात ते कुटुंबासोबत राहत होते. ४ सप्टेंबरला त्यांना करोनाची लक्षण्े जाणवल्यानंतर काही दिवस उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना मुंबईच्या सेव्हनहिल रुग्णालयात हलविण्यात आले होते. अखेर त्यांचा मृत्यू झाला.

पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक नागनाथ येमपल्ले, पनवेल पालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी शोक व्यक्त केला असून सरकारतर्फे करोना योद्धय़ांना मिळणारी नुकसानभरपाई तातडीने गुरव यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवू असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

पनवेल शहर व ग्रामीण परिसरात करोनाबाधितांची संख्या वाढत असून १९ हजार६६० जण आतापर्यंत बाधित झाले आहेत. त्यातील २ हजार ९२५ जणांवर उपचार सुरू असून आतापर्यंत ४३० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

४३० जणांचा मृत्यू

पनवेल शहर आणि पनवेलच्या ग्रामीण भागात आतापर्यंत ४३० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. पालिकेच्या पंधराशे कर्मचारी व अधिकाऱ्यांपैकी १२५ जणांना करोनाची लागण झाली आहे. महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी दत्तात्रय नवले यांनाही करोनाची लागण झाली असून त्यांनी उपचारानंतर पुन्हा सेवा सुरू केली आहे. उपविभागीय अधिकारी नवले यांच्या कुटुबीयांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आयुक्त देशमुख यांची आई आजारी असून तेही कर्तव्य बजावत आहेत.