उरण : सिडकोने चाणजे,नागाव ,केगाव ,बोकाडवीरा,पागोटे व फुंडे येथील गावातील १ हजार ३२७ सर्व्हे नंबर मधील शेतकऱ्यांच्या जमीनी संपादनासाठी २२ डिसेंबरला सुधारित अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध सुरू केला आहे. यासाठी शनिवारी सायंकाळी नागाव मध्ये झालेल्या बैठकीत सिडको विरोधात रस्त्यावर उतरून विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.

सिडको विकासाच्या नावाखाली कोणताही प्रकल्प किंवा योजना जाहीर न करता तसेच शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सिडकोने एकतर्फी अधिसूचना जाहीर केली आहे. त्यामुळे येथील शेतकरी संतप्त झाला आहे. सिडकोच्या पहिल्या अधिसूचनेला यापूर्वीच शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. तरीही सिडकोने नव्याने अधिसूचना जाहीर केली आहे. यामध्ये वाढीव सर्व्हे नंबर समाविष्ट करण्यात आले आहेत.

हेही वाचा… गौतम नवलखा यांची पुन्हा चौकशी? भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी आहेत नजर कैदेत…

या जमीनीवर शेतकऱ्यांची ७०-८० वर्षांपूर्वीची पारंपरिक शेत घरे आहेत. तसेच उरणमध्ये येऊन नोकरी व्यवसायानिमित्त स्थायीक झालेल्या नागरिकांनीही आपल्याला राहण्यासाठी या जमिनीवर घरे बांधली आहेत. सिडकोने याचा विचार न करता यातील बहुतांश जमीनी संपादीत करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे सिडकोच्या विरोधात नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. सिडकोला द्रोणागिरी नोड मध्ये साडेबारा टक्के विकसित भूखंड वाटपासाठी जमिन कमी पडत आहे. त्यासाठी चाणजे,नागाव- केगाव आणि इतर गावातील जमीनी नव्याने संपादीत करण्यासाठी अधिसूचना काढली आहे. परंतु राहती घरे असतांना जमीनी संपादीत केल्या जात असल्याने शेतकरी आणि घर मालकांनी या भूसंपादनाला तीव्र विरोध दर्शविला आहे. तशा हरकती सिडकोकडे नोंदविण्यात आल्या आहेत. असे असतांनाही सिडकोकडून या विभागात जमिनीचे संपादीत करीत असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत सिडको विरोधात संघर्षाची भूमिका घेतली आहे.

हेही वाचा… घरफोडी करणाऱ्या शिकलगार टोळी सूत्रधार अटक… ४ गुन्हे उघडकीस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुन्हा संघर्ष होणार

सिडकोच्या अधिसूचनेला लेखी हरकती अर्ज घेऊन ४ जानेवारीला सकाळी ११ सिडको भवन बेलापूर येथे जाण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीला जेष्ठ नेते सुरेश ठाकूर, राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रशांत पाटील,सिडको बाधित प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष कॉ. भूषण पाटील व सचिव अरविंद घरत,विजय पाटील, रामचंद्र म्हात्रे,काका पाटील तसेच नागाव,केगाव व म्हातवली ग्रामपंचायतीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.