नवी मुंबई: निसर्गप्रेमींना बेलापूरातील ॲग्रो गार्डन मध्ये फुलपाखरांसोबत न्याहरी करता येणार आहे. तसेच ५० प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजाती आणि विविध झाडे, वेली, फुले, पक्ष्यांसोबत निसर्गप्रेमींना पाहता येणार आहेत. फुलपाखरांसोबत न्याहरी या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, २ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० ते ११ वाजेपर्यंत बेलापूर सीबीडी सेक्टर ९ येथील ॲग्रो व्हेजिटेबल फार्म आणि बटरफ्लाय गार्डन असणार आहे.

शहरांची वाटचाल काँक्रीटच्या जंगलाच्या दिशेने होत असताना, लोकप्रयत्नातून बहरलेले निसर्ग उद्यान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे, आणि शहरातील नागरिकांनी एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात घालवावा, या ॲग्रो गार्डन मध्ये विविध उपक्रम राबवले जातात. या गार्डनमध्ये शेकडो प्रकारच्या झाडांच्या सहवासात सामान्य फुलपाखरांसोबतच काही दुर्मिळ फुलपाखरांच्या प्रजातींनीचा अधिवास आहे. याच ठिकाणी महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मन, कॉमन मॉर्मन, पेंटेड लेडी, लाईम, प्लेन टायगर, वाँडरर आणि इतर असंख्य फुलपाखरे जवळून पाहण्याची व त्यांच्याविषयी जाणून घेण्याची संधी निसर्गप्रेमींना मिळणार आहे. हा कार्यक्रम सर्व वयोगटातील लोकांसाठी सशुल्क असणार आहे. वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. सुरेश भागवत आणि फुलपाखरांविषयी संशोधन करणारे अभ्यासक यावेळी माहिती देणार आहेत.

ॲग्रो गार्डन म्हणजे नेमके काय ?

डम्पिंग ग्राऊंड आणि उच्च दाबांच्या विजेच्या तारांच्या खाली असलेल्या जागेत मागील ३० वर्षात बेलापूरमधील सेक्टर ९ येथील नागरिकांनी एकत्र येऊन श्रमदान आणि स्वखर्चातून निसर्ग उद्यान तयार केले. येथे ५० जातींची फुलपाखरे आढळतात. विविध पक्षी, किटक आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे वास्तव्य देखिल आहे. स्थानिक नागरिकांच्या सहभागातून विविध प्रकारची फळझाडे, औषधी वनस्पती, वेली, फुलझाडे, फळभाज्या, पालेभाज्यांची शेती या माध्यमातून शहराच्या मध्यभागी हे निसर्ग उद्यान आहे.

कार्यक्रम कधी आणि कुठे

ॲग्रो गार्डन मध्ये फुलपाखरांसोबत न्याहरी हा उपक्रम रविवार, २ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० ते ११ या वेळेत ॲग्रो व्हेजिटेबल फार्म आणि बटरफ्लाय गार्डन, सेक्टर-९, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे होणार आहे. अधिक माहितीसाठी  ९८२०२२६१७१ या क्रमांकावर संपर्क साधावा.