उरण तालुक्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या पिरवाडी किनाऱ्यावर सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी शेकडोच्या संख्येने पर्यटक येत असून किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांसाठी येथील मोडकळीस आलेली जेट्टी जीवघेणी ठरत होती. ओएनजीसीने ही जुनी जेट्टी हटविण्याचे काम महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून पूर्ण करून घेतले आहे.

दहा वर्षांत ५० पेक्षा अधिक पर्यटकांना या जेट्टीमुळे आपले जीव गमवावे लागले होते. त्यामुळे ही जेट्टी हटविण्याची मागणी येथील ग्रामस्थ व पर्यटकांकडून सातत्याने केली जात होती. याची दखल घेत महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने जेट्टी हटविण्याचे काम सुरू केले आहे. जेट्टी हटविल्यामुळे पिरवाडी किनाऱ्याचा विस्तार झाला आहे.

उरण पनवेलसह नवी मुंबईतील पर्यटकांसाठी एक दिवसाचा आनंद लुटण्यासाठीचे जवळचे पर्यटन स्थळ म्हणून मागील पंचवीस वर्षांपासून उरणमधील पिरवाडी किनारा प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्याही वाढू लागली आहे. मात्र तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी अरबी समुद्रातील ओएनजीसी तेल शुद्धीकरण प्रकल्पातील तेल विहिरीतील कच्च्या तेलावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाची उभारणी याच किनाऱ्यावर करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी लागणारे साहित्य आणण्यासाठी तात्पुरत्या जेट्टीची उभारणी मेरीटाइम बोर्डाने केली होती. त्यानंतर ही जेट्टी कायम राहिल्याने जेट्टीच्या विखुरलेल्या अवशेषांमुळे येथे अपघात होत होते. त्यामुळे ही जेट्टी हटविण्यासाठी ओएनजीसीकडून आर्थिक सहकार्य करण्याची अडचण होती. गेली अनेक वर्षे मागणी करूनही जेट्टी हटविली जात नव्हती. मात्र ओएनजीसीने आर्थिक तरतूद केल्याने जेट्टी हटविण्याचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे किनाऱ्यावरील  पर्यटकांची संख्याही वाढू लागल्याची माहिती येथील व्यावसायिक आतीष म्हात्रे यांनी दिली. तसेच अपघात कमी झाल्याने पर्यटकांकडूनही आनंद व्यक्त केला जात आहे.