पालिकेच्या मोहिमेचा फज्जा; मुख्यालयात उपाहारगृहासह सर्वत्र प्लास्टिकचा सर्रास वापर
नवी मुंबई महानगरपालिकेने मोठा गाजावाजा करत आणि सेलेब्रिटींच्या उपस्थितीत सुरू केलेल्या प्लास्टिकमुक्त नवी मुंबई अभियानाला चार दिवसांत केराची टोपली दाखवण्यात आली आहे. अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी, रविवारी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘प्लास्टिकचा वापर करणार नाही व माझ्या कुटुंबीयांना, मित्रांना, परिचितांनाही प्लास्टिकेचे धोके सांगेन व प्लास्टिक न वापरण्याची विनंती करेन,’ अशी शपथ दोन हजार नवी मुंबईकरांच्या उपस्थित घेतली होती, मात्र प्रत्यक्षात पालिका मुख्यालय, अग्निशमन केंद्र, रुग्णालय, विभाग कार्यालय अशा सर्वच ठिकाणी कर्मचारी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरत आहेत. एवढेच नव्हे तर पालिका मुख्यालयातील कॅन्टीनमध्येदेखील सर्रास प्लास्टिकचा वापर होत आहे.
मुख्यालयातील प्लास्टिकच्या सर्व वस्तू नष्ट केल्याचा दावा पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ येथे केला होता, मात्र अद्याप पालिका मुख्यालयात मिनरल वॉटरच्या बाटल्या आढळत आहेत. विभाग कार्यालयांमध्ये कचरा ठेवण्यासाठी प्लास्टिकचे डबे ठेवण्यात आले आहेत. प्लस्टिक च्या खुच्र्या आहेत. कॅन्टीनमध्ये प्लास्टिकच्या वाटय़ा आणि पार्सल देणासाठी प्लास्टिकच्या पिशव्या वापरण्यात येत आहेत. पालिका मुख्यालयात कागदपत्रे ठेवण्यासाठी प्लस्टिकच्या पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे. त्यामुळे प्लास्टिकमुक्ती हा केवळ स्टंट असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
प्लास्टिकमुक्त अभियान सक्षमपणे राबवायचे असल्यास प्लास्टिकच्या वस्तूंची निर्मितीच थांबवली पाहिजे. वस्तू बाजारात आल्याच नाहीत वस्तू विकत घेण्याचा व प्लास्टिक पिशव्या दिसण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
– स्नेहल रोडे, महिला
पालिकेचे कर्मचारी प्लास्टिकच्या पिशव्या वापरत असल्यास त्याच्यावर र्निबध घालण्यात येईल. तसेच पालिकेच्या कर्मचाऱ्यांना कागदी पिशव्या देण्यात येणार आहे.
– अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका

