सीवूड्स पश्चिम विभागात पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रासमोरच असलेल्या भूखंडावर मागील ३ वर्षापासून बेकायदा सुरु असलेल्या आश्रमशाळेवर जिल्हा महिला बाल विकास विभागाने कारवाई करत अस्वच्छ व गलिच्छ वातावरणात ठेवण्यात आलेल्या ४५ मुला-मुलींची सुटका केली. त्यानंतर याठिकाणच्या बेकायदा चर्चवर पालिका व सिडकोने नुकतीच तोडक कारवाई करत भूखंड रिकामा केला आहे. परंतू एकीकडे सामाजिक सेवा भूखंडाबाबतचे सिडको व पालिकेचे दुर्लक्ष समोर आले असून याच सीवूड्स पश्चिम विभागात प्रार्थनास्थळांच्या नावाखाली सामाजिक सेवा भूखंड गिळंकृत केले जात असल्याचे प्रकार सुरु आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- ‘स्वच्छ व सुशोभित शहराच्या अपेक्षापूर्तीसाठी झोकून देऊन कामाला लागा’; नवी मुंबई पालिका आयुक्तांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना निर्देश

याच विभागात सिडकोच्या अनेक जागांवर व सेवा भूखंडावर विविध धर्मीयांनी मंदिरे ,प्रार्थनास्थळे उभारली असून प्रार्थनास्थळांच्या नावाने भूखंड गिळंकृत करण्याचा सपाटा सुरु असल्याचे चित्र आहे. याच काही मंदिरात हिंदूंच्या देवदेवतांना उघड्यावर धूळखात ठेवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.त्यामुळे या विभागातील देवदेवतांच्या व धर्मीयांच्या सुरु असलेल्या मनमानी कारभाराबाबत सिडको व पालिका दुर्लक्ष करत असून संबंधित अधिकारी फक्त दुर्लक्ष करण्याचे काम करत असल्याचे चित्र आहे.

शहराची निर्मिती करणाऱ्या सिडकोने नवी मुंबई शहर वसवले खरे पण स्वतः शहराचे शिल्पकार म्हणवून स्वतः पाठ थोपटून घेणाऱ्या सिडकोचे दुर्लक्ष का असा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिका व सिडको अधिकाऱ्यांच्या निव्वळ दुर्लक्षपणामुळे करोडोंचे भूखंड गिळंकृत करण्याचे प्रकार सुरु आहेत. आमदार गणेश नाईक यांनी वारंवार नियोजन करणाऱ्या सिडकोने सामाजिक वापाराचे भूखंड विकण्याचा सपाटा लावला असून या विरोधात नागपूर विधानसभेतही आवाज उठवला होता. एवढेच नव्हे तर सीआरझेडमध्ये येणारे भूखंड सिडकोने विकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा- नवी मुंबईत पोलीस स्थापना दिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन; युवकांशी संवाद साधण्यावर भर

रेल्वेस्थानकाच्या बाहेर असणारे वाहनतळाचे भूखंडही सिडकोने विकले आहेत.त्यामुळे भविष्य काळात नियोजनबद्ध वसलेल्या नवी मुंबई शहरात शासकीय आस्थापनांच्या दुर्लक्षपणामुळे नियोजनाचा बट्टाबोळ होणार की काय अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे. सिडकोने शहरात अनेक महत्वाचे प्रकल्प हाती घेतले असताना दुसरीकडे भूखंड विक्रीचा सपाटा लावला आहे. विमानतळामुळे नवी मुंबईला आणखी महत्व आले असून सीवूड्स विभागात मात्र अनेक सामाजिक सेवा भूखंड प्रार्थनास्थळे म्हणून अडवण्याचा प्रकार सुरु आहे. चक्क महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राच्यासमोरच सीवूड्स सेक्टर ४८ मधील बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्टच्या चर्चमध्ये बेकायदेशीररीत्या चालविण्यात येत असलेल्या आश्रमशाळेबाबतचा प्रकार समोर आल्यानंतर सीवूड्स प्रार्थनास्थळांचा प्रश्न समोर आला आहे. सीवूड्स पश्चिमेला चर्च , विठ्ठल मंदिर, जगदंबा माता मंदिर, शनि मंदिर , ज्वेल् ऑफ नवी मुंबई समोरील मशिद असे अनेक प्रार्थनास्थळे असून खरच या सर्व प्रार्थनास्थळांचे भूखंड सिडकोकडून नियमानुसार घेतले आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे याच सीवूड्स परिसरात उभ्या राहीलेल्या विविध धार्मिक मंदिरांची संख्या अधिक असून नागरी समस्यांसाठी आवश्यक असलेल्या जागा उपलब्ध होत नाही. सीवूड्स पश्चिमेचा विकास अत्यंत वेगाने झाला असून सीवूड्स स्थानक व मॉल यामुळे या विभागाला वेगळे महत्व प्राप्त झाले असताना शहरातील सर्वात मोठी असणारी पार्किंगची समस्या शहराला भेडसावू लागली असताना पार्किंगसाठी राखीव असणारे भूखंड विक्री करत आहेत. तर दुसरीकडे प्रार्थनास्थळांच्या नावाने अनेक जागा गिळंकृत करण्याचा सपाटा सुरु आहे.

शहरांची निर्मिती करणारी सिडको व दुसरीकडे महापालिका यांच्या दुर्लक्षपणामुळेच असे घडत असल्याचे समोर आले आहे. अनेक ठिकाणी अनधिकृतपणे भूखंडावर अतिक्रमण करणाऱ्यांवर सिडको व पालिका संयुक्त तोडक कारवाई करत असताना गेल्या अनेक वर्षापासून प्रार्थनास्थळांच्या नावाने गिळंकृत केलेल भूखंड मात्र असेच आंदन दिले की काय असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. त्यामुळे या विभागातील प्रश्नाबाबात पालिका व सिडको कधी गंभीर होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा- हेवी डिपॉजिटवर घर घेताय? सावधान… थेट मालाकांशीच करा करार अन्यथा…

हिंदू देवदेवतांचा अपमान……

सीवूड्स परिसरात सेक्टर ४८ येथे जगदंबा माता मंदिरात गणपतींच्या मूर्ती अशाच उघड्यावर कट्ट्यावर ठेवल्या आहेत. तर या मंदिरात मंडप डेकोरेटरचे सामान टाकल्याचे दिसत आहे. एकंदरीतच या विभागातील धार्मिक मंदिराबाबत सिडकोने एकदा तपासणी मोहिम घेऊन योग्य ती कारवाई करण्याची आवश्यकता असून मंदिरांच्या व देवस्थानांच्या नावाखाली जागा हडप करण्याचा तर प्रकार नाही ना अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा- शिष्यवृत्ती परीक्षेत नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

अनेक वर्षापासून आम्ही सीवूड्स विभागात कवी कुसुमाग्रज वाचनालय सार्वजनिक संस्था ही सीवूड्स पश्चिम विभागात गेली अनेक वर्षापासून चालवत आहोत.खाजगी सोसायट्यामधील दुकान भाड्याने जागा घेऊन वाचनालयाद्वारे वाचनसंस्कृती जपण्याचा प्रयत्न करत आहे. परंतू सिडको, पालिका, शासन यांना वारंवार सामाजिक सेवा भूखंडाची मागणी करुनही आमची फरफट केली जाते. मात्र दुसरीकडे प्रार्थनास्थळांच्या नावाने भूखंड हडपण्याचे प्रकार जोरात सुरु आहेत. त्यात काही ठिकाणी हिंदूंच्या देवदेवतांचे पावित्र्य राखले जाते का असा प्रश्न आहे. वाचनसंस्कृती टिकवण्यासाठी सिडकोकडे नियमानुसार मागणी करुनही वाचनालयासाठी जागा उपलब्ध करुन दिली जात नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांकडेही पाठपुरावा सुरु आहे, अशी माहिती कवी कुसुमाग्रज वाचनालायाचे कार्यवाह ललीत पाठक यांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Plots to be swallowed up in the name of places of worship in seawoods navi mumbai dpj
First published on: 06-01-2023 at 19:15 IST