नवी मुंबई पोलिसांची सहा तासांत कारवाई
नवी मुंबई : पश्चिम बंगाल येथून नोकरीचे आमिष दाखवून अपहरण केलेल्या युवतीची सुटका केवळ सहा तासांत करण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने केली.
हबीबमुल्ला अंचर मोल्ला (वय २८) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शनिवारी एका सामाजिक संस्थेने नवी मुंबई पोलिसांना पश्चिम बंगाल येथील एका १५ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले असून ते नवी मुंबई परिसरात असल्याची माहिती दिली होती. याबाबत आयुक्त संजयकुमार यांना माहिती मिळताच तात्काळ कारवाईचे आदेश त्यांनी संबंधित विभागाला दिले. अपहरणकर्ता बामनडोंगरी भागात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी गावात जाऊन चौकशी केली असता नीलेश म्हात्रे चाळीत नवीन कुणीतरी आल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी चौकशी केली असता एका घरात अपहृत झालेली युवती आढळून आली. तिच्याकडून मिळालेल्या माहितीवरून तिला ९ तारखेला अश्रफऊल शाएब मोल्ला ऊर्फ बाबू आणि त्याचा मित्र हबीबमुल्ला अंचर मोल्ला या दोघांनी नोकरीचे आमिष दाखवून नवी मुंबईत आणले होते.
११ तारखेला अश्रफ परत गावी गेला. याप्रकरणी हबीबमुल्ला याला ताब्यात घेण्यात आले आहे तर मुख्य आरोपी अश्रफऊल याच्याबाबत कोलकाता पोलिसांना कळविण्यात आले आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन गरड, साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनीता भोर पोलीस उपनिरीक्षक एस. पी. क्षीरसागर, जे. ए. सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.