खड्डय़ांबरोबर उड्डाणपुलावरील दिवे बंद असल्याने वाहनचालक त्रस्त

मुंबई व नवी मुंबईला जोडणाऱ्या शीव-पनवेल महामार्गावरील खड्डयांबरोबरच आता वाहनचालकांना उड्डाणपुलावरील दिवे बंद असल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या महामार्गावरच काही दिवसांपूर्वी मोठा गाजावाजा करत या उड्डाणपुलावर पिवळ्या रंगाचे दिवे सुरू करण्यात आले होते. पण रात्रीच्या वेळी हे दिवेच बंद असल्याने टोल आकारूनही सोयीसुविधा नसल्याने वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

सायन पनवेल महामार्गावरून मुंबई ठाण्याकडे, तसेच पनवेलकडे लाखो वाहनांची दररोज वर्दळ असते. मुख्यत्वे करून तुभ्रे नाका ते उरण फाटा या मध्यवर्ती गर्दीचा महामार्ग सायन पनवेलला जोडणार मध्य मार्ग असल्याने वाशी एपीएमसी मार्केट, शिरवणे, नेरुळ एल पी, जुईनगर त्याच बरोबर तुभ्रे नाका, औद्योगिक क्षेत्रातून वाहनांची मोठी वर्दळ सुरु असते. सायन-पनवेल महामार्ग सुरू झाल्यांनतर पनवेल मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी खारघर येथे आणि वाशीवरून नवी मुंबईला जोडणाऱ्या वाशी टोल नाका येथे टोल आकारला जातो. दैनंदिन लाखो रुपयांचा टोल भरूनही सायन पनवेल महामार्ग हा असुविधांच्या कचाटय़ात आहे. या महामार्गासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने १२०० कोटी रुपये खर्च करूनही या रस्त्यावरील खड्डे आणि पथदिव्यांची समस्या कायम असून एखादा मोठा अपघात झाल्यानंतर प्रशासन जागे होणार का? असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे.

पिवळे दिवेदिवसा सुरू रात्री बंद

हा रस्ता वर्षांभरापूर्वी सहा पदरी बांधण्यात आला. त्यावर शिरवणे आणि उरण फाटा येथे उड्डाणपुलांची उभारणी करण्यात आली. मात्र आता याच मार्गावर समांतर रस्त्यांबरोबरच उड्डाणपुलावरील पिवळे दिवे मागील काही महिन्यांपासून बंद आहेत. अनेक ठिकाणचे दिवे हे दिवसा सुरू असतात, मात्र बहुतांश वेळा रात्री मात्र हे दिवे बंदच असतात. उरण फाटा येथे पुलावर चढल्यांनतर तुभ्रे नाका उड्डाणपुलापर्यंत वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावरील काही भागात पथदिवे बंद असल्याने वाहनचालकांना वाहनाच्या प्रकाशावरच स्वत:चे वाहन मार्गक्रमण करावे लागते. तर अनेकदा दिवे बंद असल्याने वाहनांच्या अपघाताचे प्रकारही घडले आहेत.

सायन-पनवेल महामार्गावरून मागील तीन वर्षांपासून प्रवास करत आहे. कधी रस्त्याचे खोदकाम, उड्डाणपुलाचे काम तर कधी वाहिन्या टाकण्याचे काम सुरू असल्याने हा रस्ता नेहमीच वाहतूक कोंडीच्या छायेत असतो. उरणकडे जाणारे मोठे कंटेनर याच मार्गावरून जातात. मागील दोन ते तीन महिन्यांपासून उड्डाणपुल आणि रस्त्यांवरील अध्रे निम्मे दिवे बंद आहेत. सुरुवातीला हे दिवे सुरू होते, मात्र अवघ्या काही दिवसांतच हे दिवे बंद पडले आहेत.

यंशवत कर्डिले, वाहनचालक.