उरण: पहिल्याच पावसानंतर उरण शहर आणि ग्रामीण भागात बारा तासांहून अधिक काळ वीज गायब होती. तर गुरुवारी पावसाने उसंत घेतल्याने उकाड्यात प्रचंड वाढ झाली. त्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना विजेच्या लपंडावामुळे महावितरणविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

उरण शहरात विजेचा नेहमीचा लपंडाव कायम सुरू असतो. महावितरणकडून देखभाल दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद करूनही वारंवार खंडित होणाऱ्या विद्युतपुरवठ्यामुळे उरण पूर्व विभागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. विद्युतपुरवठा खंडित का झाला? अशी विचारणा केल्यावर महावितरणाच्या कर्मचारी व अधिकारी यांच्याकडून योग्य उत्तर मिळत नाही. त्याचप्रमाणे महावितरणाचे कर्मचारी फोन बंद करून बसतात. त्यात जरी संपर्क झाला तरी फोनदेखील उचलायची तसदी घेत नाहीत अशी तक्रार नागरिक करीत आहेत.

तीन दिवस गावे अंधारात

उरण शहर व परिसरात विद्युतपुरवठा खंडित होण्याचे प्रकार दररोजचे आहेत. गेल्या तीन दिवसांपासून उरण तालुक्यातील सारडे, वशेणी पुनाडे ही गावे अंधारात आहेत. उरणच्या पूर्व विभागाला भेंडखळ मार्गे वीजपुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्या टाकण्याचे काम सुरू करण्यात आले होते. त्यामुळे पावसाळ्यात या परिसरातील अनेक दिवस खंडित होणारी वीज नियमित होणार आहे. मात्र पावसामुळे हे काम रखडण्याची शक्यता आहे.

दैनंदिन जीवनावर परिणाम

कोणतेही कारण न देता वीजप्रवाह खंडित करण्याचे प्रकार होत आहेत. त्याचा परिणाम आमच्या दैनंदिन आयुष्यावर होत आहे. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून मात्र फोन उचलले जात नाहीत. अशी प्रतिक्रिया शारदा ठाकूर यांनी दिली आहे. येथील व्यावसायिकांनाही याचा फटका बसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उरणच्या पूर्व विभागाला वीजपुरवठा करणाऱ्या वाहिन्या नादुरुस्त झाल्याने वीज खंडित झाली होती. ती पूर्ववत करण्यात आली आहे. तर भेंडखळ मार्गे वीज वाहिन्यांचे काम पूर्ण करण्यात येणार असून उरण शहरातील वारंवार वीज खंडित होत असेल त्या संदर्भात दुरुस्ती करण्यात येईल. – जयदीप नानोटे, अभियंता, महावितरण उरण